Pune Crime News: गणेशोत्सवापूर्वी पुण्यात पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. या भागात गुन्हे शाखेने बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी पाच पिस्तूल आणि 11 काडतुसे जप्त केली आहेत. पोलीस आता दोन्ही आरोपींची चौकशी करून या प्रकरणाचा तपास करत आहेत.


पुण्यातील पोलिसांनी दोन आरोपींना अवैध पिस्तुल आणि 11 काडतुसांसह अटक केल्याची माहिती आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आकाश प्रकाश जाधव (23) आणि मुजम्मील हारून बागवान यांचा समावेश आहे. आकाश कात्रजमधील भिलारेवाडी येथील रहिवासी आहे तर मुजम्मिल अहमदनगरमधील श्रीरामपूर येथील रहिवासी आहे.


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे. यासोबतच लोकांच्या हालचालींवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. हे पिस्तूल दुसऱ्या राज्यातून येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली. 



गणेशोत्सवानिमित्त पोलिसांचा विशेष बंदोबस्त
पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. मात्र या 10 दिवसात अनेक प्रकारचे गुन्हे समोर येतात. यंदा दोन वर्षांनी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात होणार असल्याने नागरीकांची गर्दीदेखील मोठ्या प्रमाणात असेल. त्यासाठी पोलिसांनी मागील काही दिवसांपासूनच शहरात विशेष बंदोबस्त ठेवला आहे. यात नागरीकांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्यासोबतच शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुन्हे रोखण्याला मदत होणार आहे. 


लखनौच्या काडतुसाच्या पार्सलचं  पुणे कनेक्शन  


दोन दिवसांपुर्वीच काडतूसाचं पार्सल पुण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. लखनौच्या अमौसी विमानतळावर कार्गो पार्सलमध्ये पाच काडतूसं सापडली होती. या प्रकरणाचं पुणे कनेक्शन उघडकीस आलं होतं. पुण्यातील अजीज अहमदच्या घरी ही काडतूसं पाठवण्यात येत असल्याची माहिती होती. ग्वालटोली कानपूरच्या उमर ग्राफिक्सने हे पार्सल बुक केले होते. विमानतळावर पार्सल स्कॅम करण्यात आलं त्यावेळी त्यात काडतूसं असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर लखनौमध्ये हे पार्सल आणि काडतूसं जप्त करण्यात आले होते. आयेशा नगर या ठिकाणी राहणाऱ्या पुण्यातील तरुणाच्या घरी हे पार्सल पाठवण्यात येणार होतं. या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती.