Pune Accident News: बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या स्लॅबच्या कडेने लावलेले प्लायवूड काढत असताना एका मजूराचा दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू झाला. पुण्यातील बी टी कवडे रोडवरील निगडेनगर या ठिकाणी ही धक्कादायक धटना घडली. संदीप रामकिशन कुमार असं 28 वर्षीय मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
घडल्या प्रकरणी आदित्य रामकिशन कुमार यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ठेकेदार आणि मालकावर गुन्हा दाखल केला आहे. इमारतीचे मालक रघु माणिक्कम जाधव आणि ठेकेदार सुरेश तुळशीराम कसबे असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावं आहे. दोघेही मांजरी परिसरात रहायला आहेत.
रघु जाधव यांच्या मालकीच्या इमारतीचे काम ठेकेदार सुरेश कसबे हे करत आहेत. संदीप कुमार हा दुसर्या मजल्यावरुन पहिल्या मजल्याच्या स्लॅबच्या कडेने लावलेले प्लायवूड कटावणीने काढून घेत होता. हे काम करताना त्याला सेफ्टीबेल्ट, हेल्मेट तसेच संरक्षक जाळी असे कोणतेही साहित्य पुरविण्यात आले नाही. त्याकडून धोकादायकरित्या काम करवून घेत असताना तो दुसर्या मजल्यावरुन खाली पडून त्याचा मृत्यु झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे पून्हा एकदा मजूरांच्या सुरक्षिततेचा मुद्धा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
यापुर्वी देखील अशीच घटना सिंहगड रोडवरील जयदेव नगर परिसरात घडली होती. त्यावेळी 16 व्या मजल्यावरून डक्टमध्ये पडून एका महिला कामगाराचा मृत्यू झाला होता. मीनाकुमारी साहू असे 41 वर्षीय काम करणाऱ्या मृत महिलेचं नाव होतं. त्यावेळी देखील सेफ्टी किट किंवा संरक्षणासाठी कोणतीही सामग्री न पुरवल्यामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं.
कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?
पुण्यात अनेक ठिकाणी मोठ-मोठ्या इमारती बांधकाम करण्यासाठी राज्याबाहेरुन कामगार आणले जातात. त्यांच्या राहण्याची सोय केली जाते. त्यांना योग्य वेतन मिळत असल्याने अनेक कामगार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात येतात. मात्र त्यांच्यासोबत होणाऱ्या अपघातांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे. ठेकेदारांकडून त्यांची सगळी सोय करण्यात येते मात्र काम करायच्या ठिकाणी त्यांना सुरक्षा उपकरणं पुरवले जात नाहीत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ठेकेदाराची असते मात्र ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे अशा घटनांचं प्रमाण वाढत आहे. या आधीसुद्धा येरवड्यात जाळी पडून कामगाराचा मृत्यू झाला होता. कामगारांच्या जीवाची पर्वा ठेकेदार करत नसल्याचं चित्र अनेकदा बघायला मिळालं आहे. त्यामुळे कामाराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.