Pune Crime News : घरफोडीतील आरोपी पकडण्यासाठी गेलेल्या पुणे शहर (Pune police) पोलिसांवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दौंड तालुक्यातील यवतमध्ये ही घटना घडली आहे. पुणे शहर युनिट 3 मधील पोलिसांवर आरोपीने गोळीबार केला आहे. या सगळ्या प्रकरणात एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तर दुसऱ्या आरोपीला पळून जाण्यात यश आलं आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकारणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पुणे शहरातील उत्तमनगर (uttam nagar) येथील चोरीच्या प्रकरणातील लकीसिंग टाक आणि निहाल टाक यांच्यावर आज युनिट तीनच्या पोलीस पथकाने सापळा रचला होता. मात्र लकीसिंगला ताब्यात घेतल्यानंतर निहाल टाक याने पोलिसांवर गोळीबार केला. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील उत्तमनगरमधील चोरी प्रकरणी लकीसिंग गब्बरसिंग टाक हा फरार होता. युनिट नंबर तीनला लकी सिंग हा यवत येथील मानकोबावाडा येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तेथे सापळा रचला होता.
युनिट तीनचे सहाय्यक फौजदार संतोष क्षीरसागर, पोलीस कर्मचारी दिपक क्षीरसागर, प्रकाश पडवळ, प्रकाश कट्टे हे चौघेजण खाजगी वाहनाने त्या ठिकाणी येऊन दबा धरून बसले होते. आज पहाटे तीन वाजता लकी सिंग हा मोटरसायकल वरून तेथे आला. त्याने घरासमोर गाडी लावली. त्याच्यासोबत निहालसिंग मन्नूसिंग टाक हा होता. लकी सिंग याला ताब्यात घेतले. निहालला देखील ताब्यात घेतले, मात्र त्याचवेळी निहाल हाताला झटका देऊन पळून गेला. जाताना निहाल याने प्रकाश कट्टे यांच्या दिशेने गोळीबार केला. यातून कट्टे वाचले मात्र निहाल हा फरार झाला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार आणि सरकारी कामात अडथळा आणल्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींना धाक नेमका कुणाचा?
पुण्यात काही दिवसांपूर्वी पोलिसांना मारहाण केल्याच्या दोन घटना पुढे आल्या होत्या. त्यात काही पोलीस जखमी झाले होते. पुण्यातच नाही तर मागील काही महिन्यापासून राज्यभरात पोलिसांना होणाऱ्या मारहाणीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. नागरिकांमध्ये वर्दीची भीती नसल्याचं चित्र सातत्याने समोर येत आहे. पोलिसांना असं मारहाण करत, कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे का? किंवा आरोपींना धाक नेमका कुणाचा असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.