Har Har Mahadev : हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपटाबाबत आक्षेप असतील तर निवेदन द्या मात्र मारहाण करुन दादागिरी करणं हे महाराष्ट्रात कोणीही सहन करण्यार नाही. आम्ही कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही, असे खडेबोल राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraje desai) त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सुनावले आहेत. हर हर महादेव चित्रपटावरुन सध्या राज्यात राजकारण पेटलं आहे. राष्ट्रवादीतर्फे अनेक ठिकाणी चित्रपटाचा शो बंद करुन त्यांनी राडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
चित्रपट हा इतिहासाचा विषय आहे. छत्रपतींच्या वारसदारांनी यावर आक्षेप घेतला आहे. चुकीचा इतिहास दाखवत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. काही गोष्टींचा संदर्भ इतिहासात लागत नसेल त्या दाखवणे योग्य नाही, असं माझं निर्मात्यांना सांगणं आहे. यासंदर्भात आम्ही कोणालाही आम्ही कायदा हातात घेऊ देणार नाही. चित्रपटाबद्दल आक्षेप असतील तर तुम्ही त्यांना जाऊन निवेदन द्या मात्र तिथे जाऊन कायदा हातात घेऊन प्रेक्षकांना मारण करणं ही दादागिरी महाराष्ट्र कोणीही सहन करणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
'खोक्यांच्या आरोपाविरोधात कायदेशीर मार्गाचा वापर करणार'
खोक्यांवरुन बदनामीची मोहीम शिल्लक सेनेकडून सुरु आहे, त्यामुळे खोक्यांचे आरोप थांबवण्यासाठी कायदेशीर मार्गाचा वापर करु, अशी टीका राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेवर केली आहे. त्यांनी बोलताना शिवसेनेचा उल्लेख शिल्लक सेना असा केला आहे. मागील अनेक दिवसांपासून आमच्यावर खोक्याचे आरोप केले जात आहे. या आरोपासाठी आता आम्ही कायद्याची मदत घेणार आहोत. शिंदे गटात सामील झालेल्या पहिल्या दिवसापासून आमच्यावर काहीही आरोप केले जात आहेत. मात्र खोक्याचा आरोप प्रत्येक आमदारावर केला जात आहे. आम्ही कोणते खोके घेतले, कशाचे खोके घेतले आणि कोणी खोके घेतले, हे सगळं टीका करणाऱ्यांनी स्पष्ट सांगावं. टीकाकारांना आमचं आवाहन आहे की संदिग्ध बोलू नका, खोक्यांबाबतचे सगळे पुरावे आम्हाला द्या, असे खडेबोल त्यांनी टीकाकारांना सुनावले आहेत.
'सत्ता नसल्यानं तळमल सुरु'
शिवसेनेच्या नेतृत्वाबद्दलचे आमचे मतभेद होते. आम्ही अजूनही सांगतो की आम्ही शिवसेना सोडलेली नाही. बाळासाहेब ठाकरेंचे विचारदेखील सोडले नाहीत. शिवसेनेचं नेतृत्व आम्हाला खटकलं होतं. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या आहारी जायला नको होतं. आपण स्वतंत्र राहून आपला पक्ष मोठा आणि एक नंबरचा करुया, असं आमचं मत होतं. मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचा होता आणि राज्य बाकी पक्ष चालवत होते. आदित्य ठाकरेदेखील प्रत्येक ठिकाणी आमच्यावर टीका करत आहेत. आता जे काही बोलणं किंवा समजूत काढणं सुरु आहे ते अडीच वर्षापूर्वी बोलायला हवं होतं. आमच्या पन्नास आमदारांच्या उठावामुळे सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. त्यामुळे तुम्हाला नैराश्य देखील आलं. सत्ता नसल्याने तळमळ सुरु झाली त्यामुळे त्याचा राग आता आमच्यावर निघत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.