Pune Crime News : महिलेसह तिच्या दोन लहान मुलांना जिवंत (Pune Crime) जाळल्याची धक्कादायक घटना पुण्यातून (Pune News) समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसरात चुलत दिरानेच चारित्राच्या संशयातून आपल्या वहिनीसह दोन चिमुकल्या पुतण्यांना जिवंत जाळलं आहे. कोंडव्यातील पिसोळी परिसरात बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आम्रपाली वाघमारे (वय 25), रोशनी (वय 6) आणि आदित्य (वय 4) अशी होरपळून मृत्यू (Crime News) झालेल्यांची नावं आहेत. आरोपी वैभव रूपसेन वाघमारे (वय 30) याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. समीर साहेबराव मासाळ यांनी या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. 


आरोपी रूप सेन आणि मयत आम्रपाली हे लातूर तालुक्यातील औसा येथील रहिवाशी आहेत. रूप सेन मजुरीचं काम करतो. आम्रपाली ही विवाहित असतानाही ती वैभव यांच्यासोबत काही महिन्यांपूर्वी पुण्यात आली होती. पिसोळी परिसरात एका भाड्याच्या खोलीत ते राहत होते. दरम्यान आम्रपाली हिच्या चारित्र्यावर आरोपी संशय घ्यायचा. यातून त्यांच्यात भांडण व्हायचे. बुधवारी रात्री देखील त्यांच्यात याच कारणावरून वाद झाले. त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने आम्रपाली हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर रडत असणाऱ्या घरातील दोन लहान मुलांचा देखील त्याने गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर तिघांचेही मृतदेह घरासमोर असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये नेले. घरातील कपडे आणि गादीच्या साहय्याने हे मृतदेह त्याने जाळले. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर, तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक संजय मोगले यांनी पंचनामा पूर्ण केला आहे. परीमंडळ 5 चे पोलीस उपआयुक्त विक्रांत देशमुख, सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग पौर्णिमा तावरे, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय, पोलीस उपनिरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन रत्नदीप बिराजदार हे या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुण्यात शुल्लक कारणावरुन हत्या केल्याच्या प्रकरणात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यासोबतच बाकी गुन्हेगारी देखील वाढत आहे. त्यामुळे ही गुन्हेगारी रोखणं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.