Shirgaon Sarpanch Murder : साई बाबांची प्रति शिर्डी असलेल्या पुण्यातील (Pune) शिरगावच्या सरपंचाची (Sarpanch) हत्या ही ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat Election) पार्श्वभूमीवर झाली का? असा प्रश्न उपस्थित करत, पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) त्याअनुषंगाने तपास करतील, अशी अपेक्षा विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. अजित पवारांनी आज दिवंगत सरपंच प्रवीण गोपाळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते.


कायद्याचा धाक राहिला आहे का? : अजित पवार


अटकेतील आरोपीने ग्रामपंचायत निवडणुकीवेळी प्रवीण गोपाळे यांच्याविरोधात पॅनेल उभं केलं होतं. मात्र ग्रामस्थांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यावर भर दिला. त्याच रागातून हे कृत्य घडलंय का? याबाबत पोलीस तपास करत आहेतच. त्यातून सत्य समोर येईलच, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. तसेच कुटुंबीयांनी हत्येमागची कारणं माझ्याकडे सांगितल्याचा दावा अजित पवारांनी केला. मात्र ती कारणं माध्यमांसमोर सांगणं उचित ठरणार नाही. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याअनुषंगाने कुटुंबीयांनी सांगितलेली कारणं तपास यंत्रणेपर्यंत पोहोचवू. गोपाळे यांची हत्या ज्या क्रूरतेने करण्यात आली, हे पाहता कायद्याचा धाक राहिलाय का? अशी शंका येत असल्याचं अजित पवार म्हणाले.


कोयत्याने वार करुन सरपंचाची हत्या


शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची शनिवारी (1 एप्रिल) प्रतिशिर्डी साई बाबांच्या मंदिरासमोर कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी शिरगाव ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली होती. त्यात प्रवीण गोपाळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले होते. प्रवीण गोपाळे यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपींना शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशाल उर्फ किरण सुनील गायकवाड (वय 25 वर्षे), संदीप उर्फ अण्णा छगन गोपाळे (वय 31 वर्षे) आणि ऋतिक शिवाजी गोपाळे (वय 22 वर्षे) अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. यापैकी विशाल गायकवाड हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आलं आहे. दरम्यान या हत्येचे मुख्य कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु जमिनीच्या प्लॉटिंगवरुन ही हत्या झाल्याचं बोललं जातं आहे.


अवघ्या पंचवीस सेकंदात हत्या


शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची अवघ्या पंचवीस सेकंदात हत्या करण्यात आली. तीन अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत गोपाळे वर कोयत्याने हल्ला केला. हत्येच्या चार मिनिटांपूर्वीचा सीसीटीव्ही फूटेज समोर आलं असून अवघ्या पंचवीस सेकंदात त्यांनी होत्याचं नव्हतं केलं. यात गोपाळे हे साई बाबांच्या मंदिरासमोरील मार्गावर दुचाकीला खेटून एकाशी बोलत उभे असल्याचं दिसतं. त्याचवेळी 9 वाजून 6 मिनिटांनी एका दुचाकीवरुन दोघे आले अन् यूटर्न घेऊन निघून गेले. मग 9 वाजून 8 मिनिटांनी तिघे आले अन् ते तसेच पुढे गेले. तर पुढच्या एक ते दीड मिनिटांनी ते तिघे पुन्हा दुचाकीवरुनच आले, यावेळी मात्र त्यांनी थेट गोपाळे यांच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. पहिलाच प्रहार हा डोक्यावर केला अन गोपाळे जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. मात्र दहा फुटांवरच या हल्लेखोरांनी त्यांना पुन्हा घेरलं अन् तिथेही कोयत्याने सपासप वार केले. पंचवीस सेकंदापूर्वी गोपाळे यांना त्यांच्याबाबत असं काही घडेल याची कल्पना ही नसावी. पण पुढच्या पंचवीस सेकंदात ते भर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर गोपाळे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तो पर्यंत उशीर झाला होता.