Pune Crime News :  पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. त्यातच स्पा सेंटर चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यांच्याकडून अशा प्रकारच्या अवैध स्पा सेंटरवर कारवाई करण्यात येत आहे. आज वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फातिमानगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी करत पाच महिलांची सुटका केली आहे तर एका आरोपीला अटक केली आहे. श्रीधर मोहन साळुंखे (वय 42, पवळे चौक कसबा पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वानवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फातिमानगर येथील क्लिओज स्पा अँड सलून या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीची पोलिसांनी खात्री करून सदर ठिकाणी छापा टाकला असता वेश्याव्यवसाय करताना पाच महिला दिसून आल्या. पोलिसांनी या पाचही महिलांची सुटका करून स्पा मालक श्रीधर साळुंखे याला अटक केली. 


आरोपीने पैशाचे आमिष दाखवून या पाच महिलांना मसाज सेंटरमध्ये काम देण्याच्या आमिषाने आणले होते. त्यानंतर या महिलांना जास्त पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून तो या ठिकाणी वेश्याव्यवसाय करून घेत होता. पोलिसांनी या पाचही महिलांची सुटका केली असून आरोपीला अटकही केली आहे. वानवडी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



वारजे-माळवाडी परिसरातील स्पा सेंटरवर काही दिवसांपूर्वी छापा


काही दिवसांपूर्वी देखील पोलिसांनी अशाच सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याचं उघडकीस आल्यानंतर पुण्यातील वारजे-माळवाडी परिसरात ओम स्पावर छापा टाकून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली होती. त्यावेळी स्पा सेंटरच्या मॅनेजरला पुणे पोलिसांनी अटक केली होती. संदीप संतोष तिवारी (वय 23 वर्षे) असं स्पा मॅनेजरचं नाव होतं. वारजे माळवाडी येथील ओम स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. त्याने इशारा करताच ओम स्पावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकला. तेथे दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. संदीप तिवारी या मॅनेजरला अटक करण्यात आली.