Pune Cyber Crime news : पुण्यात बाकी गुन्ह्यांबरोबरच (Pune Cyber Crime news ) सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. रोज अनेकांना अनेक गोष्टींचं आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घातल्याचे प्रकार समोर आले आहेत. सायबर पोलिसांच्या पथकाने क्रिप्टोबिझ कंपनीचा संचालक राहुल विजय राठोड (वय 35, रा. हिंजवडी) याच्यासह त्याचा साथीदार ओंकार दीपक सोनवणे (25, रा. कोंढवा) याला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. या दोघांवर 43 हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप असून, त्यांनी सुमारे 2 कोटी 930 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून महागड्या कार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दोन दुचाकी, एक मोटारसायकल, एक लॅपटॉप, एक मोबाईल संच, एक पेन ड्राईव्ह जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदारांपैकी एक असलेल्या रविशंकर पाटील यांना त्यांच्या योजनेत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला त्यांनी अनेकांना वेळोवेळी गुंतवणुकीवर परतावा दिला. मात्र अधिक पैसे गुंतवल्यावर त्यांनी त्यांना पैसे देणे बंद केले आणि त्यांची गुंतवणूक परत केली नाही. अनेकांनी राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
CryptoBiz एक्सचेंज आणि CryptoBiz अॅप वापरुन केला तपास
पोलिसांनी तपास केला आणि CryptoBiz एक्सचेंज आणि CryptoBiz अॅप वापरून आरोपींचा शोध घेतला. आरोपींना अटक करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस इतरांना पुढे येऊन घटनांची तक्रार करण्याचे आवाहन करत आहेत.
सायबर गुन्ह्यांत वाढ...
पुण्यात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण सातत्याने वाढ झाल्याचं समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी एका इन्व्हेस्टमेंट कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवत 200 कर्जदारांची 300 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला होता. अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे मालक सेलवाकुमार नडारने अनेक लोकांची फसवणूक केली होती. या सेलवाकुमार नडार याने लॉकडाऊनमध्ये आयटी क्षेत्रातील अनेक लोकांची माहिती घेतली. या सगळ्या लोकांची यादी तयार केली. नडार आणि साथीदारांनी गुंतवणुकीवर परतावा देण्याचे आमिष दाखविले होते.
गुंतवणूक करताना काळजी घ्या...
अशा प्रकारच्या अनेक गुंतवणुकीचं आमिष दाखवणाऱ्या कंपन्या पुण्यात आहे. या कंपन्यांकडे अनेकांची यादी असू शकते. त्यामुळे कोणत्याही कंपनींत किंवा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.