Old Pune-Mumbai highway Accident : जुन्या पुणे मुंबई महामार्गावर शनिवारी भीषण अपघात झाला. दरीमध्ये बस कोसळून 13 जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मुंबईहून पुण्याला एक ढोल पथक आलं होतं. पिंपरी चिंचवड परिसरातील पिंपरी गुरव या ठिकाणी या पथकाने ढोल वादन केले होते. ढोल वादन संपल्यानंतर परत मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. या अपघातात काही लहान मुलांचा देखील मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये वीर मांडवकर या बारा वर्षीय चिमुरड्याचा देखील समावेश आहे. याच वीरचा आता ढोल वाजत असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हळहळ व्यक्त केली जात आहे.
वीर याला ढोल वाजवण्याचा छंद होता. गोरेगाव येथील बाजीप्रभू ढोल ताशा पथकात तो वादन करायचा. आंबेडकर जयंती निमित्त हे पथक पुण्यातील पिंपळे गुरव परिसरात आले होते. मात्र वादन संपल्यानंतर पुन्हा घरी परत जात असताना खोपोली जवळ त्यांच्या बसला अपघात झाला. बस खोल दरीत कोसळली आणि यामध्ये तेरा जणांना आपले प्राण गमवावे लागले. चिमुकल्या वीरचे हे आंबेडकर जयंती निमित्त केलेले ढोल वादन अखेरचे ठरले. वीरच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर आणि बाजीप्रभू ढोल ताशा पथकावर दुःख कोसळले आहे.
वीरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ढोल ताशा वादन म्हटलं की अनेकांमध्ये फार उत्साह असतो. वीर हा त्यांच्या पथकातील सर्वात लहान वादकांपैकी एक होता. वीरने सगळ्या मिरवणूकीत जल्लोषात वादन केलं. घामेघूम होतपर्यंत जातपर्यंत त्याने वादन थांबवलं नव्हतं. त्याच्यासोबत इतर वादकांनीही जोरदार वादन केलं. यांच्या शेवटच्या वादनाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत वीर वादन करताना दिसत आहे. त्याच्यासोबत इतर वादकही दिसत आहे. वादनाचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे.
12 वर्षाचा वीर वादन करुन दमला... गाडीत झोपला अन् उठलाच नाही...
वीर जल्लोषात वादन करुन परतीच्या प्रवासासाठी निघाला होता. दमला असल्याने तो झोपला. त्याच दरम्यान बस दरीत कोसळली आणि निवांत झोपलेला विर उठलाच नाही. घरातील 12 वर्षांचं खेळत , बागडतं मुल गेल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर पसरला आहे. शिवाय सोबतच्या अनेक पालकांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.