पुणे : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या पथकाने  (PUNE CRIME)  कोथरूड येथील हॉटेल खिंड ढाब्यावर टाकलेल्या छाप्यात ढाबाचालक ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था करुन देत असताना आढळून आला. या प्रकरणात ढाबाचालकासह चार मद्यपींना अटक करुन एकाच दिवसात आरोपपत्र दाखल करुन न्यायालयासमोर सादर केले असता न्यायालयाने ढाबाचालकाला 1 लाख रूपयांचा दंड, मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 2 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. 


राज्य उत्पादन शुल्क 'सी' विभागाच्या पथकाने शनिवार (ता.27) रोजी कोथरूड येथील हॉटेल खिंड या ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक योगेश सुरेश माथवड हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असताना आढळून आल्याने त्याचेसह चार मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, कोर्ट क्र. 1 शिवाजी नगर, पुणे यांच्या न्यायालयात सादर केले.  ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रताप बोडेकर, किरण पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक संदिप लोहकरे, महिला जवान उज्ज्वला भाबड, जवान शरद भोर, गोपाळ कानडे व वाहनचालक सचिन इंदलकर यांच्या पथकाने पार पाडली.


लोकसभा निवडणूक 2024 च्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून बेकायदेशीर तसेच बनावट मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके नेमण्यात आली असून परराज्यातील दारुच्या अवैध वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. ढाबा, हॉटेलच्या अचानकपणे तपासण्या करण्यात येत आहेत. ढाब्यावर दारु विक्री करणे तसेच त्याठिकाणी बसून दारु पिणे कायद्याने गुन्हा आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाया केल्या जातील, असे राज्य उत्पादन शुल्क सी विभागाचे निरीक्षक एस. एस. कदम यांनी कळवले आहे.


कडक कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील  परिस्थिती लक्षात घेता अतिसंवेदनशील आणि  संवेदनशील  भागाची यादी तयार करावी.  या भागातील मतदान केंद्राला पोलीस विभागासोबत भेटी देऊन आवश्यक त्या सर्व सुरक्षितेतच्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. अशा भागात तातडीने शस्त्रास्त्रे जमा करण्याची कार्यवाही करावी. गुन्हेगारीवृत्तीला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.


इतर महत्वाची बातमी-


कुठे ऊन, कुठे पाऊस! ठाणे, मुंबईत उन्हाच्या झळा, IMD कडून यलो अलर्ट; विदर्भ, मराठवाड्यात पाऊस


Shrirang Barne : मोदींच्या सभेनंतरही महायुतीत खदखद कायम; प्रचारावर नजर ठेवण्यासाठी दिल्लीचं पथक मावळात पाठवण्याची 'वेळ'.


Guru Gochar 2024 : आज होणार गुरु ग्रहाचं सर्वात मोठं संक्रमण! पुढच्या वर्षापर्यंत 'या' राशींवर असणार गुरुची कृपा; धन-संपत्तीत होईल प्रचंड वाढ