Chandrakant Patil : मागील काही दिवस प्रचारादरम्यान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील 'हू इज धंगेकर?' हा प्रश्न विचारत डिवचलं होतं. मात्र ते आमच्यापुढे टिकणार नाहीत असं म्हणणारे चंद्रकांत पाटील यांनी आता हू इज धंगेकर? यावर विचारल्यावर मौन पाळलं आहे. कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे निवडून आले. त्यानंतर सगळीकडे 'हू इज धंगेकर?, धंगेकर नाऊ एमएलए' अशा घोषणा देऊन धंगेकरांच्या समर्थकांनी चंद्रकांत पाटलांना चांगलंच डिवचलं आणि तसे पोस्टर्सही पुण्यात लावण्यात आले. 


चिंचवडच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांचं अभिनंदन करण्यासाठी चंद्रकांत पाटील गेले होते. त्यावेळी त्यांनी धंगेकरांच्या मुद्द्यावर बोलणं टाळलं. चंद्रकांत पाटलांनी अश्विनी जगताप यांचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आमदार म्हणून त्या लवकरच अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहायला मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. खासदार संजय राऊतांनी निवडणूक आयोगाबद्दल अपशब्द वापरत केलेल्या शिवीगाळच्या वक्तव्यावर बोलणं त्यांनी टाळलं.


चंद्रकांत पाटलांनी धंगेकरांना डिवचलं होतं...


भाजपने कसबा पोटनिवडणुकीत धंगेकरांना पराभूत करण्यासाठी चांगलीच फौज मैदानात उतरवली होती. रोड शो, प्रचारसभा, कोपरा सभा घेतल्या होत्या. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील मैदानात उतरले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी प्रचार सभेत रवींद्र धंगेकरांना चांगलंच डिवचलं होतं. भरसभेत हू इज धंगेकर तो आमच्यासमोर टिकू शकत नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर धंगेकरांचे समर्थक पेटून उटले होते त्यांनी सगळ्या कसब्यात पुणेरी पाट्या लावल्या होत्या. विजयानंतर त्यांनी ही कविता व्हायरल करुन चंद्रकात पाटलांना चांंगलंच उत्तर दिलं. धंगेकर नाऊ.. MLA असं आता सगळीकडे व्हायरल केलं. कसबा हा मागील 28 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. खासदार गिरीश बापट यांच्यानंतर मुक्ता टिळकांनी कसब्याचा विकास केला. त्यानंतर पहिल्यांदाच या मतदारसंघात कॉंग्रेसने मुसंडी मारली आहे. ही निवडणूक भाजपने मोठी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांचा हा विजय भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. 


धंगेकर फीवर कोल्हापुरात..


कसब्याची पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी जिंकल्यानंतर कोल्हापुरात देखील होर्डिंग लावण्यात आले. मात्र या होर्डिंगवर 'धीस इज धंगेकर' म्हणत चंद्रकांत पाटील यांच्यावर महाविकास आघाडीने टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांचा प्रचारात सर्वसामान्य घरातील धंगेकर यांना अपमानास्पद उल्लेख केला होता आणि म्हणूनच हे होर्डिंग लावल्याचे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे.