Pune Crime News : उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खाजगी सावकाराने (Savkar) त्या व्यक्तीला समोर बसवून त्याच्या बायकोवर बलात्कार (Rape) केला. इतकंच नाही तर या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ तयार करुन हा व्हिडीओ आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल केला. पुण्यातील हडपसर (Hadapsar) परिसरात फेब्रुवारी 2023 मध्ये ही घटना घडली होती. 34 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी इम्तियाज हसीन शेख (वय 47 वर्षे) याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
सावकाराचा तक्रारदार महिलेवर पतीसमोरच बलात्कार
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीला आरोपीने उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले हे पैसे फिर्यादीचा पती परत करु शकला नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीत बोलावून घेतले. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या पतीला समोर बसून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. सोबतच तक्रारदार महिलेसोबत पतीसमोरच जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले.
व्हिडीओ सोशल मीडियावर पब्लिश केल्यानंतर महिलेची पोलिसात धाव
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आरोपीने मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड देखील तयार केला. त्यानंतर पुन्हा आरोपीने फिर्यादी महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र महिलेने नकार दिल्याने आरोपीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पब्लिश केला. यानंतर महिलेने हडपसर पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली. तक्रार आल्यानंतर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी इम्तियाज हसीन शेखला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सावकारांच्या जाचाला कंटाळून सहकार विभागाच्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं
पुण्यात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सावकारांच्या जाचाला कंटाळून सहकार विभागातील अधिकाऱ्याने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली होती. सहकार विभागाच्या लेखाधिकाऱ्याने मंगळवार पेठेतील बालाजी हाईट्स या इमारतीमधील राहत्या घरी 19 सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं. गणेश शंकर शिंदे (वय 52 वर्षे) असं आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचं नाव होतं. गणेश शिंदे यांनी सुसाईड नोटही लिहिलेली होती, ज्यात सावकारांनी पैशांसाठी तगादा लावल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. मुंबईतून पुण्याला बदली हवी, यासाठी अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी गणेश शंकर शिंदे यांनी सावकारांकडून 20 ते 25 टक्के व्याजदराने 84 लाख 50 हजार रुपये कर्ज घेतलं होतं.
हेही वाचा