पुणे: उरण येथील यशश्री शिंदेची (Yashashri Shinde) निर्दयीपणे हत्या (Uran Murder Cae) करण्यात आली, या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. देशभरात या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपासाची सूत्रं हातात घेतली असून वेगानं तपास सुरू आहे. अशातच सांगली जिल्ह्यातून अशीच एक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून तरूणीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, 'तू माझ्यासोबत लग्न करण्यासाठी नकार का देतेस? तू मला का टाळतेस? या कारणावरून 21 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातून पुण्याच्या चाकणमध्ये येऊन आरोपीने हे कृत्य केलं आहे. मात्र, पिंपरी चिंचवड पोलिसांनी अवघ्या बारा तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अविराज खरात असं या आरोपीचं नाव असून दोघे एकाच तालुक्यात राहणारे आहेत. 


अविराजचे खून केलेल्या तरूणीवर एकतर्फी प्रेम होतं. दोघांमध्ये मैत्रीचा संवाद होता, पण तरूणी मैत्रीपेक्षा जास्त कोणत्या नात्यात गुंतायला तयार नव्हती. अशातच डिप्लोमा पूर्ण केलेली तरूणी पुण्याच्या चाकण एमआयडीसीमध्ये नोकरीसाठी आली. नोकरी करताना वाढलेला ताण आणि वेळेचं गणित तरूणी आणि अविराजमध्ये संपर्क होण्याचं प्रमाण हळूहळू कमी होऊ लागलं. यातून अविराजने वेगळे अर्थ काढायला सुरुवात केली. तरूणी अन्य कोणाच्या प्रेमात पडली का? त्यामुळंच ती मला टाळते का? याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी अविराज 28 जुलैला सांगली जिल्ह्यातून थेट पुण्यात आला. चाकण एमआयडीसी परिसरात त्याने तरूणीला गाठलं. तिला विश्वासात घेऊन तो अंबेठाणच्या दिशेने गेला, अविराजच्या मनात काय सुरुये आहे आणि पुढं जाऊन नेमकं काय घडणार आहे. याची पुसटशी कल्पना तरूणीला नव्हती. 


थोडं पुढं गेल्यानंतर अविराजने निर्जनस्थळी गाडी थांबवली. गाडीवरून उतरताच त्याने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तू माझ्याशी लग्न करायला का नको म्हणतेस? तू मला का टाळतेस? हाच जाब विचारत असताना अविराजने सोबत आणलेला चाकू बाहेर काढला. चाकू बघताच आपण अविराजवर विश्वास ठेवून इथं येण्याची मोठी चूक केल्याचं लक्षात आलं होतं. तितक्यात अविराजने हातातील चाकूने गळा चिरला आणि पोटात वार केले. मग पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अविराजने तरूणीचा मोबाईल सोबत घेतला. घटनेनंतर तो सांगली जिल्ह्याच्या दिशेने निघाला. रात्री सव्वा अकराच्या सुमारास पिंपरी चिंचवड पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली. तरूणीची ओळख पटवत, तिचा मोबाईल क्रमांक मिळवण्यात आला. त्याआधारे कॉल रेकॉर्ड मिळवण्यात आले, मोबाईल लोकेशन आणि तरूणीचा फोनवरून शेवटचा झालेला संपर्क, या सर्वांचा पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेने तपास लावला. सांगली जिल्ह्याच्या दिशेने पळून गेलेल्या अविराजला कराड जवळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पिंपरी चिंचवड पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत अविराजला ताब्यात घेतलं.