नवी मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढायची घोषणा केल्यापासून ते महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांवरही मुक्तपणे टीका करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी महायुती सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेवरुन खोचक टोला लगावला होता. यानंतर कालच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले होते. अजित पवार (Ajit Pawar) पुण्यात नसतानाही येथील धरणं भरली, अशी टिप्पणी राज यांनी केली होती. यानंतर अजितदादा गटाच्या अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले होते. सुपारीबहाद्दरांनी अजित पवारांवर बोलू नये, असा टोला मिटकरी यांनी राज ठाकरे यांना लगावला होता. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेचे नेते गजानन काळे पुढे सरसावले. त्यांनी ट्विट करत शेलक्या भाषेत अमोल मिटकरी यांचा समाचार घेतला. 


गजानन काळे यांनी अमोल मिटकरी यांच्यावर नेमकी काय टीका केली?


70 हजार कोटीचा घोटाळा करून नुसते पान सुपारी नाही, तर महाराष्ट्राला चुना लावला अजित दादांनी( हे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत)
तरी घासलेट चोर वर तोंड करून आम्हाला सुपारीबाज बोलतोय  ... अजित दादांच्या घरातल्या सदस्यांना एकदा नव्हे तर दोनदा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आणि कसल्या राजसाहेब ठाकरे यांच्या यश अपयशाच्या बाता मारतो रे घासलेट चोर ...??? हिम्मत असेल तर स्वतः चा पक्ष काढून २ आमदार निवडून आणावेत तुमच्या दादांनी…!!! मग जाहीर मिशी कापून तुझ्या हातात देवू ... 


उगाच पवार साहेबांचा पक्ष चोरून रेघोट्या मारू नका... पक्ष चोरून पण १ खासदार निवडून आणताना दमछाक झाली तुमच्या दादांची 
(ते सुनील तटकरे पण स्वतःच्या हिम्मतीवर आले) टी शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक मटणकरी कुठला ...
आम्हाला शिकवायचं नाय, लायकीत राहायचं, लायकीत !!!






अमोल मिटकरी यांनी काय म्हटलं होतं?


अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणं भरली, ही राज ठाकरे यांची खोचक टीका अमोल मिटकरी यांच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख थेट सुपारीबाज असा केला होता. टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या सुपारीबहाद्दरांनी अजित पवारांवर बोलू नये.  हे सुपारी बहाद्दर टोल नाक्याचे आंदोलन असेल, भोंग्याचे आंदोलन असेल किंवा आणखी कुठले आंदोलन असेल त्यांना जीवनात कुठल्याही आंदोलनाला यश आले नाही. राज ठाकरेंना एनडीआरएफचा साधा लाँग फॉर्मही सांगता आला नाही म्हणजे राजकारणातील हा सर्वात मोठा जोक आहे. राज ठाकरे या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखा आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले होते. 


आणखी वाचा


Video : ''ते नसतानाही पुण्यात धरण वाहिलंय''; राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला, पूरस्थितीवरुन निशाणा