Pune News : बलात्कार आणि हत्या प्रकरणात एका इसमास पोलिसांनी गुंतवल्याचं समोर आलं आहे. मृत्युदंडाची शिक्षा भोगणाऱ्या या निर्दोष व्यक्तीची तब्बल तेरा वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली आहे. पुढील आठवड्यात तो तुरुंगाबाहेर ही पडेल, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ बी एच मरलापल्ले यांनी दिली. प्रकाश निषाद असं त्याचं नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. ठाण्यात जून 2010 मध्ये सहा वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करुन तिची हत्या झाली होती, या धक्कादायक प्रकारात प्रकाशला गोवण्यात आलं होतं. 


'चिमुरडी गायब झाली अन् नंतर थेट मृतदेह सापडला'


प्रकाश 2010साली उत्तरप्रदेश येथून मुंबईत आला. नोकरीच्या शोधात तो ठाण्यात पोहोचला, तिथे एका वर्कशॉपमध्ये त्याला नोकरी मिळाली. तिथंच एका चाळीतील आठ बाय आठच्या खोलीत तो एकटा राहत होता. सकाळी लवकरच कामाला जायचं आणि रात्री उशिरा घरी पोहोचायचं, असा त्याचा दिनक्रम होता. त्यामुळे आसपासचं कोणी फारसं त्याला ओळखत नव्हतं. मात्र स्वयंपाक बनवण्यासाठी लागणाऱ्या काही वस्तू तो शेजारीच असणाऱ्या एका विवाहित महिलेकडून घ्यायचा. कामावर जाता-येता कधीतरी त्याच महिलेशी प्रकाशच थोडंफार बोलणं व्हायचं. अशात जून महिन्यात त्या महिलेची सहा वर्षीय चिमुकली अचानकपणे गायब झाली. तिचा शोध सुरु होता, दुसऱ्या दिवशी प्रकाशने कामावर जाताना त्या महिलेस धीर दिला. अशातच सायंकाळी एका नाल्यात चिमुरडीचा मृतदेह आढळला. शरीरावर कुठे ही इजा नव्हती, त्यामुळे ती पाण्यात पडून दगावली असेल, असा समज झाल्याने कुटुंबियांनी पोलिसांना तसं लिहून दिलं. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये अपघाती निधनाची नोंद करण्यात आली. मात्र शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब समोर आली.


'पोस्ट मार्टममधून धक्कादायक बाब समोर'


शवविच्छेदन अहवालात चिमुकलीवर बलात्कार करुन तिची हत्या झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. मात्र कुटुंबियांना ते पचनी पडलं नाही. त्यामुळे तपासासाठी आलेले सब इन्स्पेक्टर गणपत चिल्लवार यांनी स्वतःच फिर्याद दाखल केली. ते फिर्यादी झाल्याने तपास एपीआय सुधीर कुडळकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता. डीवायएसपी दीपक देवराज यांच्या निगराणी खाली तपासाची चक्र हलली. मग पोलिसांनी कुटुंबियांकडे चौकशी केली असता प्रकाशचे पीडितेच्या आईशी बोलणं व्हायचं, अशी माहिती समोर आली. त्यामुळं घटनेच्या दुसऱ्याच दिवशी प्रकाशच्या खोलीची झडती घेण्यात आली. मात्र पोलिसांच्या हाती काही लागलं नाही. तरीही त्याला दुसऱ्या दिवशी ताब्यात घेण्यात आलं. मग त्याचं बळजबरीने रक्त घेऊन कपड्यांना लावण्यात आलं ते कपडे पुन्हा प्रकाशच्या खोलीत ठेवण्यात आले. त्यानंतर पंचनामा करुन वैद्यकीय अहवाल आणि पुरावे बनवण्यात आले. प्रकाशला बलात्कार आणि हत्या प्रकरणात अटक करुन गोवण्यात आलं. 


'प्रकाशला विनाकारण गोवल्याचं सिद्ध'


जिल्हा सत्र न्यायालय 2014 पर्यंत आणि उच्च न्यायालयात 2015 पर्यंत खटला चालला. त्यानंतर 2017 साली सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु झाली. अशात या प्रकरणात पुण्यातील ज्येष्ठ विधिज्ञ बी एच मरलापल्ले यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लक्ष घातलं. त्यानंतर पुढील सुनावणीत त्यांनी डीवायएसपी दीपक देवराज, एसीपी सुधीर कुडळकर आणि पथकाने केलेला तपास, तसेच सादर केलेले पुरावे एकेक करुन खोडून काढले. सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास हा संपूर्ण प्रकरण आलं आणि अखेर या आठवड्यात प्रकाशला पोलिसांनी बलात्कार आणि हत्या प्रकरणात विनाकारण गोवल्याचं सिद्ध झालं. 


अखेर तब्बल तेरा वर्षांनी प्रकाशची सुटका...


 गेली तेरा वर्षे तुरुंगात असणाऱ्या आणि मृत्युदंडाची शिक्षा भोगणाऱ्या प्रकाशची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ बी एच मरलापल्ले यांनी दिली. 19 मार्चला या सुनावणीचा निकाल प्रदर्शित करण्यात आला असून पुढील आठवड्यात प्रकाशची तुरुंगातून सुटका होणार आहे. यानिमित्ताने पोलिसांच्या तपासावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. वयाच्या 24व्या वर्षी तुरुंगात गेलेला प्रकाश 37व्या वर्षी तुरुंगातून बाहेर पडणार आहे. पोलिसांनी विनाकारण त्याला या प्रकरणात गोवल्याने त्याचं कधीही न भरुन निघणारं नुकसान झालं आहे. आता त्याची किंमत कोण मोजणार? शिवाय त्या चिमुकलीवर बलात्कार करुन तिची हत्या करणारा तो नराधम कोण? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता तपास अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहेत.