Pune Crime News : पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये कोयता गँगची (Koyata Gang) दहशत मोठ्या प्रमाणावर वाढली होती. शहरातील अनेक भागात पोलिसांनी कारवाई देखील केली होती. मात्र आता पुन्हा एकदा शहर परिसरात कोयता गँगने दहशत घालण्यात सुरुवात केली आहे. लोहगाव परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास कोयता गँगच्या (Koyata Gang) गुंडांनी दुकानाची आणि वाहनांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नाही, तर हातात कोयते नाचवत या गुंडांनी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना देखील धमकावल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे आजुबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 


शहरातील घडलेल्या या घटनेबाबत विमानतळ पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून दहशत माजवणाऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे. पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या (Koyata Gang) गुंडांना पकडून शहरातून भररस्त्यात त्यांची धिंड देखील काढली होती. अनेक गुंडांना तडीपाराच्या नोटीसा देखील पाठवल्या होत्या. गेल्या काही दिवसांमध्ये कोयता गँगची दहशत कमी झाल्याचं दिसून येत होतं. मात्र,पुन्हा एकदा अशा घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, पुन्हा कोयता गँग (Koyata Gang) सक्रिय होताना दिसत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात लोहगाव परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक कोयता गँगचे गुंड (Koyata Gang) आले. त्यांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवायला सुरूवात केली. आम्ही इथले भाई आहे, आमच्या नादाला लागू नका, असं म्हणत परिसरातील स्थानिक नागरिकांना धमकावल्याची माहिती समोर आली आहे.


कोयता गँगमधील (Koyata Gang) या आरोपींनी परिसरात दहशत माजवत असतानाच दुकानांची, दुचाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे. त्याचबरोबर चेनाराम चौधरी यांच्या दुकानातही कोयता गँगच्या गुंडांनी कोयत्याने (Koyata Gang) तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी दुकानात तोडफोड करत धुडगूस घातला. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला. या गुंडांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न आता स्थानिकांना पडला आहे. 


घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल


या घटनेचे व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक हातात कोयता (Koyata Gang) घेऊन दुकांनांची आणि दुचाकी गाड्यांची तोडफोड करताना दिसत आहे. या गुंडांना पोलिसांचा वचक राहिला नसल्याचं चित्र आता समोर आलं आहे.