Pune Crime News : पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून शेतात (Pune Crime News) अफूची लागवड केल्याच्या घटना सातत्याने पुढे येत आहेत. या प्रकरणी शेतकऱ्यांना अटकही झाली आहे. अशीच घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातही शेतात अफूची लागवड केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे. बन्सीलाल गेनभाऊ हुले (वय 73 वर्षे, रा. पिंगळवाडी) असे अटक केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी असलेल्या बन्सीलाल गेनभाऊ हुले यांनी लांडेवाडी, पिंगळवाडी येथील कांद्याच्या पिकामध्ये अफूच्या झाडांची लागवड केली होती. याप्रकरणी पोलिसांनीच तक्रार दाखल केली होती. हुले यांची पिंगळवाडी गावात चार गुंठे शेती आहे. याच शेतात अफूची लागवड केली आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने या शेताची पाहणी केली. त्यावेळी शेतात अफूची लागवड केल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी हुले याला अटक केली आणि माल जप्त केला आहे.
कारवाईचा बडगा
इंदापूर, पुरंदर, राजगुरुनगर, होळकरवाडी पाठोपाठ आंबेगाव तालुक्यातही कारवाई करण्यात आली. इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे अफूची सामूहिक शेती करणाऱ्या सहा शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून इंदापूर पोलिसांनी 1 कोटी 41 लाख 74 हजार रुपये किमतीची 7 हजार 87 किलो वजनाची झाडे जप्त केली आहेत. काशीनाथ बनसुडे, दत्तात्रय बनसुडे, राजाराम शेलार, लक्ष्मण बनसुडे, माधव बनसुडे, रामदास शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. एन.डी.पी. एस.कायदा 1985 चे कलम 8,15, 18, 46 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी त्यांच्या माळेवाडी गावाच्या हद्दीतील जमिनीमध्ये थोड्या थोड्या अंतरावर बेकायदेशीररित्या विनापरवाना व्यावसायिक हेतूने एकूण सात हजार 87 किलो वजनाची अफूची झाडे लावली होती.
शेतकऱ्यांवर पोलिसांची करडी नजर
अफूची शेती करणं महाराष्ट्रात बेकायदेशीर आहे. तरीही अनेक शेतकरी अमली पदार्थांची शेती करताना दिसतात. पैशांसाठी शेतकऱ्यांचा हा खेळ सुरु असतो. मात्र याचा पोलिसांना सुगावा लागला की शेतकऱ्यांवर कारवाई होते. अफूच नाही तर गांजाची लागवड केल्याचे प्रकार देखील अनेकदा समोर आले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध परिसरातील शेतकऱ्यांवर अफूची किंवा इतर अमली पदार्थाची लागवड केल्याने कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या विशेष पथकाकडून अशा शेतकऱ्यांवर नजर देखील ठेवण्यात येते.