Pune Crime News : शिक्षकी पेशाला काळीमा (crime news) फासणारी घटना समोर आली आहे. शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर शाळेतील क्रीडा शिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महानगरपालिकेच्या शाळेत ही संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी 23 वर्षीय (Counseling) शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश गोविंद चिलवेरी असं या शिक्षकाचं नाव आहे. 'गुड टच बॅड टच' हा उपक्रम एका स्वयंसेवी संघटनेने राबवला होता. यातून हा प्रकार समोर आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार नोव्हेंबर 2022 पासून सुरू होता. कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपी एका प्राथमिक शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून नोकरीला होता. मागील दोन महिन्यांपासून तो शाळेतील चार ते पाच विद्यार्थिनींना मोबाईल वरून मेसेज पाठवायचा. तसेच त्यांच्याशी जवळीक साधून त्यांचे चुंबन घेऊन त्यांना मिठी मारायचा. त्यांच्यासोबत गैरवर्तन करायचा. हा सगळा प्रकार पोलिसांना कळताच त्यांनी शिक्षकाला अटक करत गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात पॉक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आधिक तपास सुरू आहे.
'गुड टच बॅड टच' हा उपक्रमातून माहिती समोर
काही दिवसांपूर्वी कोंढव्यातील प्राथमिक शाळेत 'गुड टच बॅड टच'उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमात संघटेने सगळ्या मुलींशी संवाद साधला. त्यांना बोलकं करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक मुलींनी त्यांच्यासमोर त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रकार सांगितले. त्यात यामध्ये मुलींना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल सांगण्यात आल्यानंतर विनयभंग झालेल्या विद्यार्थिनींनी हा संपूर्ण प्रकार समोर आणला. ज्या शिक्षकांवर पालक डोळे झाकून विश्वास ठेवतात तेच शिक्षक भक्षक ठरल्याने पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. शाळकरी मुलांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात अशा घटना वारंवार समोर येत आहे. त्यामुळे पालकांनी नक्की विश्वास तरी कोणावर ठेवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
'गुड टच बॅड टच' कार्यक्रम गरजेचा
सध्या पुण्यात अनेक शाळांमध्ये शाळकरी मुलींसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या समुपदेशनाचा वर्ग घेतला जातो. त्यात अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. सायकोलॉजिस्ट किंवा इतर डॉक्टर प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसतात. या संवादातून विद्यार्थिनींना अनेक प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. लैंगिकतेबाबत माहिती दिली जाते. त्यासोबतच गुड टच बॅड टच याची देखील उत्तम प्रकारे माहिती दिली जाते. यामुळे विद्यार्थिनींना लैंगिक छळाबाबत माहिती मिळते.