Daund Murder Case : संशयाचं वेळीच निरसन झालं नाही तर तो किती भयानक रूप धारण करतो हे पुणे जिल्ह्यात उघडकीस आलेल्या पवार आणि फुलवरे कुटुंबातील सात जणांच्या हत्याकांडातून समोर आलं आहे. आपल्या मुलाच्या अपघाती मृत्यूमागे काहीतरी काळंबेरं आहे या संशयातून कल्याण पवार आणि त्याच्या भावांनी त्यांचा चुलतभाऊ असलेल्या मोहन पवारसह त्याच्या कुटुंबातील सात जणांची हत्या केली. आरोपींच्या मनातील संशयाची आग इतकी भडकली होती की त्यांनी मोहन पवार यांच्या सात, पाच आणि तीन वर्षांच्या नातवांचीही गय केली नाही. ज्या संशयावरून या हत्या झाल्या तो अपघाती मृत्यू संशयास्पद असल्याचं पोलिसांच्या तपासात अद्याप तरी आढळेलल नाही. 


मोहन पवार आणि त्यांचे चुलत भाऊ कल्याण पवार हे मूळचे बीड जिल्ह्यातील गेवराईचे आहेत. पोट भरण्यासाठी दगड फोडण्याचं काम जिथं मिळेल तिकडे आपल्या कुटुंबाचा बाडबिस्तारा घेऊन जायचं हेच त्यांचं आयुष्य. गेले काही महिने हे पाथरवट कटुंब अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात रस्त्याच्या कडेला दगड फोडण्याचं काम करत होतं आणि तिथेच पालावर राहत होतं. मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या एका घटनेनं या कटुंबात संशयाच्या भुताचा शिरकाव झाला आणि त्या वणव्यात अख्ख कुटुंब जळून खाक झालं. 


14 सप्टेंबरला मोहन पवारांचा वीस वर्षांचा मुलगा अनिल आणि कल्याण पवारचा 19 वर्षांचा मुलगा धनंजय हे कामानिमित्त दुचाकीवरून पुणे जिल्ह्यातील वाघोलीला निघाले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वाघोलीवरून परत येत असताना पुणे - अहमदनगर रस्त्यावरील पेरणे फाटा इथं एका चायनीजच्या स्टॉलवर ते जेवायला थांबले. मात्र जेवण करून रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला असलेल्या दुचाकीकडे जात असताना एका भरधाव कारने धनंजयला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या धनंजयला 108 रुग्णवाहिकेतून पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. घाबरलेला अनिल त्या रात्री एकटाच पारनेरला पोहचला आणि गप्प राहिला. दुसऱ्या दिवशी धंनजयच्या आई - वडिलांनी त्याला धनंजय कुठे आहे? असं विचारल्यावर त्यानं त्याचा काल रात्री अपघात झाल्याचं आणि त्याच्यावर ससून रुग्णलयात उपचार सुरु असल्याचं सांगितलं.


धनंजयचे आई - वडील ससून रुग्णालयात पोहचले. पुढचे तीन दिवस डॉक्टरांनी प्रयत्न करूनही धनंजयचा 19 सप्टेंबरला मृत्यू झाला आणि त्याच्या कुटुंबाच्या डोक्यात संशयाच्या भुताने प्रवेश केला. सोबत असलेल्या अनिलला साधं खरचटलंसुद्धा नाही आणि आपला मुलगा जीवानिशी कसा गेला या संशयाने कल्याण पवार आणि त्याच्या कुटुंबाला पछाडलं. त्यातून वाद वाढत गेला. अनेक महिने सुरु असलेला हा वाद गेवराईला जाऊन जात पंचायतीसमोर मिटवूया असं दोन कुटुंबांमध्ये ठरलं.


त्यानुसार 17 जानेवारीला दोन्ही कुटुंब रात्री नऊ वाजता पारनेरहून गेवराईला जायला निघाले. ज्याच्यावर संशय होता तो अनिल पवार मात्र गाडीत नव्हता. तर अनिलचे वडील मोहन, आई संगीता, अनिलची विवाहित बहीण राणी, राणीचा नवरा श्याम फुलवरे आणि शाम आणि राणीची  सात, पाच आणि तीन वर्षांची रितेश, छोटू आणि कृष्णा ही मुलं सोबत होती. पारनेरहून निघालेली गाडी भीमा नदीच्या काठावर पोहचली आणि कल्याण पवार आणि त्याच्या कुटुंबाने मोहन पवार आणि त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला. गळा दाबून सगळ्यांची हत्या करण्यात आली आणि आत्महत्येचा बनाव रचण्यासाठी सगळे मृतदेह नदीत फेकून देण्यात आले . 


18 जानेवारीला यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. दुसऱ्या दिवशी आणखी एक आणि तिसऱ्या दिवशी आणखी एक असे तीन मृतदेह आढल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी चौकशी सुरु केली असता कल्याण पवार आणि त्याच्या कटुंबीयांनी मोहन पवारचा मुलगा अनिल याने एका मुलीला पळवून आणल्याने बदनामीच्या भीतीने या कुटुंबाने आत्महत्या केल्याचं सांगितलं. मात्र पोलीस या सांगण्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. पोलिसांनी या सगळ्यांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड्स तपासले असता मोहन पवार आणि कल्याण पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचे मोबाईल लोकेशन एकाचवेळी भीमा नदीच्या काठावर आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी कल्याण पवार आणि त्याच्या कुटुंबीयाकडे चौकशी सुरु केली आणि हे हत्याकांड समोर आलं.


धनंजय पवारच्या पेरणे इथं झालेल्या अपघाती मृत्यूबद्दल त्याचे वडील कल्याण पवार आणि कुटुंबाला अनिलवर संशय होता. मात्र पोलिसांच्या तपासात धनंजयच्या बाबतीत घातपात झाल्याची कुठलीही बाब अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. त्यामुळं केवळ आणि केवळ संशयाने पछाडून कल्याण पवारने त्याचा चुलत भाऊ मोहन आणि त्याच्या कुटुंबीयांची हत्या केल्याचं स्पष्ट झालंय . संशय आणि शंका प्रत्येकाच्या मनात येत असतात. पण त्यांचं वेळीच योग्य रीतीने निरसन झालं नाही तर काय होतं हे यातून दिसून आलं आहे.