Pune Bypoll Election : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) हे आज दिल्लीहून थेट पुण्यात येणार आहेत. पुण्यातील कसबा पेठ (Kasba By-Election) आणि चिंचवड (Chinchwad By-Election) या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार घोषित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही मतदार संघासासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून उमेदवारी कोणाला मिळणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी इच्छुकांची नावे केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
कसबा पेठ विधानसभेसेठी पुणे भाजपकडून पाच नावे प्रदेश समितीकडे पाठवण्यात आली आहेत. ज्यामध्ये मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक, गणेश बिडकर, हेमंत रासने आणि धीरज घाटे यांच्या नावांचा समावेश आहे. या पाचपैकी तीन नावे केंद्रीय समितीकडे पाठवण्यात येणार आहेत. 26 फेब्रुवारीला या दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. तर 2 मार्चला निकाल लागणार आहे.
बैठकांचं सत्र सुरुच
पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून उमेदवारी कोणाला मिळेल?, याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यात भाजपकडे इच्छुकांची मोठी यादी आहे. चिंचवड आणि कसबा मतदार संघासाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी आतापर्यंत भाजपने तीन बैठका घेतल्या आहे. या तिन्ही बैठकांमधून इच्छुक उमेदवारांची नावं समोर आली आहे. त्यातील नावं प्रदेश समितीकडे पाठवण्यात आली आहे. कसबा भाजपचा पारंपारिक मतदार संघ असल्याने इच्छुकांची मोठी यादी आहे. त्यात आमदार मुक्ता टिळकांच्या कुटुंबियांपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
25 फेब्रुवारीला भाजपने चिंचवड मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. त्यात उमेदवार जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र या बैठकीत भाजपची राजकीय रणनिती ठरली. या बैठकीला आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू लक्ष्मण जगताप, पत्नी अश्विनी जगताप, मुरलीधर मोहोळ, आमदार महेश लांडगे यांच्यासह चिंचवडचे स्थानिक भाजपनेते उपस्थित होते. या सगळ्या पोटनिवडणुकीची जबाबदारी आमदार महेश लांडगे, माधुरी मिसाळ आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
आज उमेदवार ठरणार का?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट दिल्लीतून पुण्यात येणार आहे. पुण्यातील एका कार्यक्रमासाठी ते पुण्यात येणार आहे. त्यावेळी ते भाजपच्या नेत्यांनादेखील भेटणार आहे. त्यामुळे आज नेमका उमेदवार निश्चित होणार का? याकडे लक्ष लागलं आहे. मात्र 1 किंवा 2 तारखेला उमेदवार निश्चित होणार असं सांगण्यात आलं आहे.