Pune Crime : जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे (Mehboob Pansare) यांची जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली आहे. जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.


हत्येप्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये राजू फिरोज पानसरे यांनी फिर्याद दिली होती. जेजुरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला. राजु फिरोज पानसरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पानसरे यांच्यावर हल्ला करण्यामागे आरोपी वणेश प्रल्हाद परदेशी, किरण वणेश परदेशी, स्वामी वणेश परदेशी, काका परदेशी आणि लाल शर्ट घातलेला अनोळखी व्यक्ती अशा जणांचा समावेश होता. तर या हल्ल्यात फिर्यादी राजू फिरोज पानसरे याच्यासह साजिद युनुस मुलाणी हा देखील जखमी झाला आहे. यातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. मेहबूब पानसरे यांच्यावर कुऱ्हाड आणि पहारीने वार करण्यात आल्याची माहिती फिर्यादीत देण्यात आली आहे. आणखी तीन आरोपींचा शोध जेजुरी पोलीस घेत आहेत..


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानसरे यांचा काही लोकांशी जमिनीचा वाद सुरु होता. या कारणावरुन शुक्रवारी (07 जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवार आणि कुऱ्हाडीने हल्ला केला. ज्यामध्ये पानसरे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मेहबूब पानसरे हे खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात.


जमिनीच्या वादातून हत्या


मेहबूब पानसरे यांनी जेजुरीजवळील नाझरे धरणाच्या परिसरात धालेवाडी इथे जमीन खरेदी केली होती. मात्र या जमिनीवरुन वाद सुरु होते. त्यातच काल ते धालेवाडीत गेले असता पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर कोयता आणि कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर पानसरे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. स्थानिकांनी त्यांना जेजुरीतील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान रात्री त्यांचा मृत्यू झाला. 


पानसरे हे जेजुरी नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते. तसंच ते व्यावसायिक म्हणूनही प्रसिद्ध होते. मेहबूब पानसरे यांच्या हत्येमध्ये पाच ते सहा आरोपींचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु होतं. जेजुरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


मावळचे आमदार सुनील शेळकेंच्या भावाच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला


दुसरीकडे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या भावाच्या हत्येचा कट पिंपरी चिंचवड पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने दोनच दिवसांपूर्वी उधळला. किशोर आवरेंच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळकेंच्या भावाची खून केला जाणार होता. हत्येच्या कटात सहभागी असणाऱ्यांपैकी आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सात पिस्टल आणि 21 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्रमोद सांडभोर आणि शरद साळवीला बेड्या ठोकल्या होत्या. त्यांनीच हा हत्येचा कट रचल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी किशोर आवरेंच्या हत्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी कोणाची हत्या केली जाणार? हे अस्पष्ट होतं. पुढील तपासात आणखी सहा आरोपींची नावं निष्पन्न झाली. त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली. या सर्वांकडे चौकशी केली तेव्हा मावळचे आमदार सुनील शेळके यांचे भाऊ सुधाकर शेळके आणि संदीप गराडे यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता, अशी कबुली या आरोपींनी दिली.