पुणे : पुण्यात गुन्हेगारी चांगलीच वाढत आहे. त्यात गोळीबारांच्या (Pune Crime News) घटनेतदेखील मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. त्यातच 16 एप्रिलला पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर गोळीबार झाला होता. याच गोळीबार प्रकरणाचा पुणे पोलिसांनी छडा लावला आहे. वडिलांनीच मुलाच्या हत्येची 50 लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. संपत्तीच्या वादातून वडिलांनी सुपारी दिल्याचं देखील समोर आलं आहे. या प्रकरणी वडिलांसह 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.


धीरज दिनेशचंद्र आरगडे या बांधकाम व्यवसायिकावर 2 जणांनी गोळीबाराचा प्रयत्न केला होता. याघटनेचा सीसीटीव्हीदेखील व्हायरल झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाला मारण्यासाठी एकूण 50 लाखांची सुपारी दिली होती. त्यातले 25 लाख रुपये दिले होते आणि 25  लाख देणे शिल्लक होते. 


मिळालेल्या माहितीनुसार, 16 एप्रिल रोजी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाईट्स जवळ दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धीरज दिनेशचंद्र अरगडे यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. 


 'त्या'दिवशी नेमकं काय घडलं?


अरगडे त्यांच्या कार्यालयात आले. काम संपवून ते दुपारी 3 वाजता घरी जाण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडले. असता त्या वेळी दुचाकीवरून दोघे जण त्याठिकाणी आले. त्यांनी अरगडे यांच्या गाडीजवळ दुचाकी लावली. दुचाकीवरील सहप्रवाशाने पिस्तूल काढून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐनवेळी पिस्तूल लॉक झाली आणि त्यामुळे त्यांचा डाव फसला. अरगडे यांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. या संपूर्ण घटनेचा तपास पोलिसांनी केला असता वडिलांनीच संपत्तीच्या वादातून मुलाला जीवे मारण्याचा प्लॅन केला असल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी 6 जणांना अटक केली आहे. 


वडिलांनी कट रचला पण अखेर पितळ उघडं पडलं!


आपल्याच मुलाच्या हत्येची सुपारी दिल्याच्या या घटनेनं चांगलंच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यात गोळीबाराचा कट रचून मुलाच्या हत्येचा कट रचला मात्र तो फसल्याने वडिलांंचं पितळ उघडं पडलं. त्यामुळे कुटुंबियांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे. 


 


इतर महत्वाची बातमी-


मी शेतकऱ्यांची मुलगी अन् बायको, शेतकऱ्यांची कळकळ चांगली समजते; सुनेत्रा पवार


Ravsaheb Danve Property : रावसाहेब दानवे 42 कोटींचे धनी, एकही गाडी नाही, 18 लाखांचं पशूधन, पत्नीकडे 45 तोळे सोने, पोस्टात सर्वाधिक गुंतवणूक!