Pune Crime News : पुण्यातील (Pune) केशवनगर भागात 50 वर्षीय व्यक्तीची दिवसाढवळ्या कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली. काल (30 एप्रिल) दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रवींद्र गायकवाड असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. गैरकृत्य करताना हटकल्याने चार ते पाच जणांच्या टोळक्याने एकत्र येऊन त्यांच्यावर वार केले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मुंढवा पोलीस पुढील तपास करत आहेत.
हत्येचं कारण काय?
रवींद्र गायकवाड हे केशवनगर भागातील गुरुकृपा सोसायटीच्या पाठीमागे असलेल्या जागेवर गेले होते. त्यावेळी काही तरुण त्या ठिकाणी गैरकृत्य करत असल्याचं त्यांना दिसून आलं. या ठिकाणी बसू नका आणि निघून जा असं रवींद्र गायकवाड यांनी त्या तरुणांना सांगितलं. परंतु ही बाब तरुणांना रुचली नाही. या गोष्टीचा राग मनात धरुन त्या तरुणांनी गायकवाड यांना शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की करायला सुरुवात केली. काही वेळाने ते तरुण आणखी काही साथीदारांना घेऊन आले आणि रवींद्र गायकवाड यांच्यावर कोयत्याने तसंच इतर शस्त्राने वार केला. या हल्ल्यात गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.
प्रशासनाच्या विरोधात सामान्य नागरिकांकडून कडकडीत बंद
दरम्यान अवैध आणि गैरकृत्य करणाऱ्या तरुणांना समजावण्यासाठी गेलेल्या 50 वर्षीय रवींद्र गायकवाड यांच्या काही तरुणांनी कोयत्याने हल्ला केला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. रवींद्र गायकवाड यांच्या हत्येप्रकरणी या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी दुकानं बंद ठेवून प्रशासन आणि पोलिसांच्या विरोधात कडकडीत बंद पाळला. हल्लेखोरांना कठोरात कठोर शिक्षा करा, अशी मागणी या नागरिकांनी केली.
पुण्यात गुन्हेगारी वाढली
पुण्यात गुन्हेगारीचं (Pune Crime) प्रमाण वाढत आहे. त्यात खून, बलात्कार, लहान मुलांवरील अत्याचार (Rape) तसंच फसवणूक अशा घटनांमध्येही वाढ होत आहे. त्यातच आता गैरकृत्य करणाऱ्या तरुणांना समजावणाऱ्या एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलाय का असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकर विचारत आहेत. तसंच पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत.
हेही वाचा
Pune Crime News : चारित्र्यावर संशय आला अन् दिरानं थेट वहिनीसह दोन पुतण्यांना संपवलं; पुण्यातील घटना