A. R. Rahman: प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांचा पुण्यातील शो पुणे पोलिसांनी मध्येच  बंद पाडला. पुण्यातील राजाबहादुर मिल परिसरात रविवारी (30 एप्रिल) रात्री या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रेक्षक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. 10 वाजल्यानंतरही ए. आर. रहमान यांचा हा गाण्याचा कार्यक्रम सुरूच होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी स्टेजवर जाऊन ए. आर. रहमान यांना कार्यक्रम बंद करण्यास सांगितलं. इतकच नाही तर दहा वाजल्यानंतरही तुम्ही कसे गाऊ शकता? असे म्हणत पुणे पोलिसांनीए. आर. रहमान यांना सुनावले. 


स्टेजवर जाऊन पुणे पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडला


ए. आर. रहमान यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांनी हजेरी लावली. इतकेच नाही तर पुणे पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारीही कुटुंबीयांसह या कार्यक्रमाला हजर होते.परंतु दहा वाजल्यानंतरही कार्यक्रम सुरूच ठेवल्याने चक्क स्टेजवर जाऊन पुणे पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडला.अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतरए. आर. रहमान स्टेजच्या पाठीमागे निघून गेले.


 पुणे पोलिसांवर टीकेची झोड


दरम्यान पुणे शहरात झालेल्या या कार्यक्रमानंतर पुणे पोलिसांवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली जाऊ लागली.राजा बहादुर मिल परिसरात अनेक हॉस्पिटल आहेत, हा परिसर सायलेंट झोन असतानाही पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशी? असा प्रश्न आता विचारला जात आहे. या कार्यक्रमामुळे पुणे स्टेशन आणि परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती, अनेकांना मनस्ताप झाला .त्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी देणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.


ए. आर. रहमान यांनी प्रेक्षकांचे मानले आभार


ए. आर. रहमान यांनी त्यांच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ट्वीट शेअर करुन प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिलं, 'काल रात्री पार पडलेल्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! हा रोलर कोस्टर कॉन्सर्ट होता. शास्त्रीय संगीताचं माहेरघर म्हणजे पुणे! आम्ही लवकरच तुमच्या समोर गाणं गण्यासाठी परत येऊ!'






इतर महत्वाच्या बातम्या: 


A. R. Rahman: संगीताचा बादशाह असणाऱ्या 'ए.आर.रहमान' यांचं खरं नाव माहितीये? हिट गाण्यांना दिलं संगीत