(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News : जीव देतोय सांगणाऱ्या मेसेजनेच वाचवला जीव; देवेंद्र फडणवीसांनी असं काय केलं की तरुणानं थेट आत्महत्येचा निर्णयच बदलला...
Pune Crime News: पुण्यातील एका व्यक्तीचा जीव अवघ्या तीन मिनिटात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे पोलीस यांच्या सहाय्याने वाचवण्यात आला आहे.
Pune Crime News : पुण्यातील एका व्यक्तीचा जीव अवघ्या तीन मिनिटात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे पोलीस यांच्या सहाय्याने वाचवण्यात आला आहे. पुण्यातील एका 35 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या करणार असल्याचा मेसेज व्हॉट्सअॅपवरुन जवळच्या व्यक्तींना पाठवला होता. हा मेसेज वाचून खळबळ उडाली होती.
मेसेजमध्ये काय लिहिलेलं?
"माझ्या चुकांमुळे मी आर्थिकदृष्टया अडचणीत आलोय. मी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, पण अजून होत नाहीये. मला खूप वाईट वाटत आहे, पण परिस्थितीने मला असे करण्यास भाग पाडले आहे. म्हणून मी माझे जीवन संपवत आहे. यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये, याला सर्वस्वी फक्त मीच जबाबदार आहे" अशा आशयाचा मेसेज एका 35 वर्षीय तरुणाने सोमवारी दुपारी 2 च्या सुमारे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्याच्या जवळच्या व्यक्तींना पाठवला. सुरुवातीला हा मेसेज बघून सगळेच घाबरले मात्र त्यातील एका व्यक्तीने हा मेसेज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे पोलिसांना पाठवला आणि मग सगळी चक्र फिरली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले होते. ही बाब कळाल्यावर विषयाचे गांभीर्य बघत त्यांनी बरोबर असलेल्या पोलिसांना तत्परतेने या मुलाचा शोध घ्यायला संगितला आणि पुढील काही मिनिटात पोलीस कामाला लागले. त्या मुलाचा नंबर घेऊन पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रॅक केले आणि त्याचा शोध घेतला. पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा आत्महत्या करणारा व्यक्ती राहत होता. त्याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी आधी त्याची विचारपूस केली आणि नंतर त्याचं समुपदेशन करून त्याला आत्महत्येच्या विचारापासून दूर नेलं. पुढील काही दिवस पोलीस त्याचं समुपदेशन करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आर्थिक अडचणीत असल्याने उचलत होता टोकाचं पाऊल
या तरुणाला एक लहान मुलदेखील आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या या तरुणाने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं मात्र पुणे पोलीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच सूत्र हलवल्याने त्याचा जीव वाचला.
एका मेसेजमुळे वाचला जीव...
आपल्यासमोर अनेक ताणतणावात जगणारे लोक असतात आणि नंतर ते आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचतात. मात्र अशा व्यक्तींशी आपण संवेदनशीलतेने बोललो तर ते त्यांचं नैराश्य बोलून दाखवतात. या प्रकरणातदेखील समुपदेशनाचा फायदा झाला. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्याने नैराश्य बोलून दाखवलं आणि त्यानंतर चक्र फिरली. त्यामुळे व्यक्ती व्यक्तीमधील संवाद किती महत्त्वाचा आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.