पुणे : सीकिंग एडवेंचर या डेटिंग साईटवर अनोळखी (Pune Crime News) मुलीशी चॅटिंग करणे एका 36 वर्षीय व्यक्तीला चांगलेच महागात पडले. या मुलीने गोड बोलून या व्यक्तीला एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले आणि त्यानंतर त्याचे तब्बल 90000 रुपये लुबाडले. सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला. याप्रकरणी "बंटी आणि बबली" यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील बऱ्याच जणांना असाच गंडा घातल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. 


या तरुणीने फिर्यादीला स्वतःचे फोटो टेलिग्रामवर पाठवले आणि तुला भेटायचे आहे असे सांगितले. तरुणीच्या प्रतिसादानंतर फिर्यादीने न-हे परिसरातील एका हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि तिला भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेला. तिने फिर्यादीला बारा हजार रुपये स्वतःच्या अकाउंटवर ट्रान्सफर करण्यास सांगितले. फिर्यादीने ते केलेही. त्यानंतर मात्र यात तरुणीची हाव आणखी वाढत गेली आणि तिने 38 हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. यावेळी मात्र फिर्यादीने पैसे ट्रान्सफर करण्यास नकार दिला. यावर आरोपी तरुणीने हॉटेलच्या बाहेर थांबलेल्या एका व्यक्तीला आतमध्ये बोलावले. त्या व्यक्तीने आत आल्यानंतर फिर्यादी यांना मारहाण करत जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. नितीश सिंग आणि पूजा भट असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.


पुण्यात बंटी बबलीचा धुमाकूळ...


काही दिवसांपूर्वी खानदेशची लोकप्रिय कलाकार दिपू क्वीन (Deepu  Queen) आणि तिच्या प्रियकराने तात्काळ लोन मिळवून देतो असं सांगून नागरिकांची लाखो रूपयांची फसवणूक केली होती. स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) या प्रकरणी गुन्हा दाखल करून हेमराज बावसार आणि दिपाली पौनीकर उर्फ दिपू क्वीन यांना अटक केली होती. या बंटी बबलीच्या जोडीने तब्बल दीडशे जणांना गंडा घातल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. खानदेशी गाण्यांची उत्तर महाराष्ट्रात मोठी चलती आहे. या गाण्यांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना उत्तर महाराष्ट्रात मोठी प्रसिध्दीही मिळते. दीपू क्वीन ही खानदेशी गाण्यांमधली प्रसिध्द कलाकार आहे. सोशल मीडीयात तिच्या व्हिडीओचा चांगलाच बोलबाला आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही ती सादर करते. पण झटपट श्रीमंत होण्याच्या मोहापायी दीपू क्वीनने आणि तिचा प्रियकर हेमंत बावसार यांनी पुण्यात मानधन मायक्रो फायनान्स या नावाने ऑफिस थाटून तत्काळ कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रूपये उकळले होते आणि गुजरातला पळून गेले होते.


इतर महत्वाची बातमी-


ST Bus: 80 पेक्षा जास्त एसटी फोडल्या, 36 आगाराची वाहतूक पूर्ण बंद, एक कोटीचे नुकसान; मराठा आंदोलनाचा भडका!