पुणे : गुगलवर (Google) अनेक गोष्टी सर्च केल्या की मिळतात. पण, त्या खऱ्याच असतील असं नाही. यातून अनेकांची फसवणूक ही होते. अशाच पद्धतीने कॉलगर्लचे (Call Girl) खोटे मोबाईल नंबर गुगलवर अपलोडकरून तरुणांना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. कॉलगर्लच्या नावाने तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. गुगलवर कॉलगर्लचे खोटे मोबाईल नंबर अपलोड करून ही टोळी तरुणांची फसवणूक करत होती.
कॉलगर्लच्या नावाने खोटे फोन नंबर अपलोड करुन तरुणांची फसवणूक
कॉलगर्लचे खोटे मोबाईल नंबर गुगलवर अपलोड करून तरुणांना फसवणाऱ्या गुन्हेगारी टोळीला पिंपरी-चिंचवडच्या खंडणी विरोधी पथक आणि दिघी पोलिसांनी कोलकत्ता येथून अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. गुगलवर कॉलगर्लच्या नावाने खोटे माहिती आणि मोबाईल नंबर अपलोड करुन ही टोळी तरुणांकडून पैसे उकळायची. इतकंच नाही तर या टोळीने ब्लॅकमेल करत एका तरुणाला आत्महत्या करण्यात प्रवृत्त केल्याचं समोर आलं आहे.
सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश
कॉलगर्लचे खोटे मोबाईल नंबर अपलोड करुन तरुणांची वैयक्तिक माहिती आणि फोटो मिळवायचे आणि त्यावरून त्यांना ब्लॅकमेल करायचं, असं या टोळीचं काम चालायचं. गुगलवर कॉलगर्लचे खोटे मोबाईल नंबर अपलोड करून तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं. मग त्यांचे फोटो सोशल मीडियातून मिळवायचे आणि ते अश्लील पद्धतीने मॉर्फ करून खंडणी मागायची, अशी या टोळीची मोडस ऑपरेंडी होती.
एका तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
या टोळीने एका तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दिघी पोलीस ठाण्यात दाखल आहे. नवीनकुमार महेश राम, सागर महेंद्र राम, सूरजकुमार जगदीश सिंग, मुरली हिरालाल केवट, अमरकुमार राजेंद्र राम, धीरेनकुमार राजकुमार पांडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीकडून 15 मोबाईल, 7 व्हाईस चेंजर, 40 सिमकार्ड, 14 डेबिट कार्ड, 8 आधार कार्ड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.