पुणे: पुणे शहरातील शास्त्री चौकामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध BMW कार उभी करून लघुशंका करून त्याने जाब विचारणाऱ्या एका व्यक्तीला अश्लील चाळे करणाऱ्या तरुणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भर रस्त्यावर कार उभी करून लघुशंका केल्याचा किळसवाणा प्रकार घडला, त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणेकरांसह नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. पुण्यातील गौरव आहुजा याने सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आला आहे. मद्यधुंद अवस्थेत असताना त्याने रस्त्यावर अश्लील वर्तन केले आणि लघुशंका केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याने माफी मागितली आहे. आता पोलिसांनी गौरव अहुजाला 7 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी केली होती, आज दोन्ही आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आला आहे, कोर्टात या दोन्ही तरूणांच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला आहे.
सरकारी वकीलांचा युक्तीवाद
सार्वजनिक स्थळावर आरोपी बेशिस्तीने वागला आहे. महिला वर्ग उपस्थितीत असताना त्याने सिग्नवर लघुशंका केली आहे. यातील एकाच्या हातात दारूची बाटली देखील दिसत आहे. आरोपीने कुठले अंमली पदार्थांचे सेवन केलं होतं का? याचा तपास करायचा आहे. जोरात गाडी आरोपीने चालवली आहे. दारू पिऊन आरोपीने गाडी चालवली असून सार्वजनिक ठिकाणी त्याने बेशिस्त वर्तवणूक केली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी तो घटना घडल्यावर पळून गेला असल्याचे समजत आहे. सार्वजनिक ठिकाणावर आरोपीने ट्रॅफिक जॅम केलं होते. आरोपीला 7 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे.
भाग्येश ओसवालच्या वकीलांचा युक्तीवाद
भाग्येश ओसवाल याचे वकील पुष्कर दुर्गे यांनी युक्तीवाद करताना म्हणाले, एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. एक व्यक्ती गाडीतून खाली उतरली, पण माझा अशिल गाडीत बसला होता.ओसवाल गाडीतून खाली उतरला नाही, ओसवाल गाडी सुद्धा चालवत नव्हता. भाग्येश ओसवाल स्वतः पोलिसात हजर झाला आहे. भाग्येश ओसवाल याचा या गुन्ह्याशी काय संबंध आहे? फक्त गाडीत शेजारी बसला म्हणून त्याच्यावर कलम लावला गेला. भाग्येश ओसवाल याचा जामीन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
गौरव आहुजाच्या वकिलांचा युक्तीवाद
या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव आहुजाच्या वकिल सुरेंद्र आपुणे यांनी युक्तीवाद करताना म्हटलं की, नोटीस द्यायची नाही, मिडिया आणि राजकीय दबावाखाली या सगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या आहेत. सरळपणे सेक्शन 65 लावलं गेलं. जो पर्यंत केमिकल रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत कलम 65 लागू शकत नाही. पोलिसांनी असं कुठले ही द्रव्य जप्त केले नाही. गाडी गुन्ह्यात वापरली नाही, मिडिया ट्रायल आल्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे घडल्या आहेत. जस्टीफिकेशन पोलिसांकडून दिसून येत नाही,आरोपी पळून गेलेला नाही, तो स्वतः कराड पोलिसांकडे हजर झाला आहे असा युक्तीवाद गौरव आहुजा याच्या वकीलांनी केला आहे.
त्यावरती सरकारी वकीलांना युक्तीवाद करताना म्हटलं की, व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, आरोपीच्या हातात दारूची बॉटल आहे. 1.5 दिवस तो गायब आहे, त्यामुळे केमिकल अॅनालायझर टेस्ट झाली नाही. दारूच्या नशेत त्यांनी वाहन चालवले आहे. पोलिसांकडून सर्व नोटीस देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये युक्तीवाद करताना दिली आहे.