पुणे: पुण्याच्या विमाननगर परिसरातील एका बीपीओ कंपनीत (BPO Company) काम करणाऱ्या शुभदा कोदारे या तरुणीला तिचा सहकारी असलेल्या कृष्णा कनौजा या तरुणाने ठार मारल्याची घटना नुकतीच घडली होती. कृष्णा कनौजा याने शुभदावर कंपनीच्या आवारातच चाकूने वार केले होते. यानंतर शुभदाला (Shubhada Kodare) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कृष्णा कनौजा याला पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांकडून चौकशी होत असताना कृष्णा कनौजा (Krishna Kanaujia) याने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. (Pune Crime news)
शुभदा मी तिला दिलेले पैसे वारंवार मागूनही परत देत नव्हती. मी तिला चाकूने धमकविल्यावर कंपनीतील अधिकारी किंवा पोलिस माझी दखल घेतील आणि पैसे परत मिळतील, या आशेने मी चाकू घेऊन आलो होतो. पण या हल्ल्यात तिचा मृत्यू होईल असे वाटले नव्हते, असे कृष्णा कनौजा याने सांगितले. कृष्णा कनौजा याला न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवले आहे. पोलिसांकडून सध्या त्याची कसून चौकशी केली जात असून त्यामधून या हत्याप्रकरणाचा संपूर्ण तपशील समोर येत आहे.
शुभदा कोदारे हिने आर्थिक अडचण असताना अनेकदा कृष्णाकडून पैसे घेतले होते. गेल्या दोन वर्षांमध्ये कृष्णाने शुभदाला तब्बल चार लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती. मात्र, कृष्णाला डोळ्याची शस्त्रक्रिया करायची असल्याने तो शुभदाकडे सतत पैशांची मागणी करीत होता; पण शुभदा पैसे परत देत नव्हती. त्यामुळे कृष्णा आणि शुभदा यांच्यात कामाच्या ठिकाणी वादही झाला होता. शुभदा कोदारे हिने सहकारनगर पोलिस ठाण्यात कृष्णाच्या विरोधात तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी कृष्णाला ठाण्यात बोलावून समज दिली होती. त्यामुळे कृष्णा हा शुभदावर चिडून होता. मंगळवारी सायंकाळी शुभदा कामाला येण्यासाठी डब्ल्यूएनएस कंपनीच्या पार्किंगमध्ये आली असताना कृष्णाने धारदार चाकूने तिच्या हातावर पाच वार केले. हल्ल्यात मोठया प्रमाणावर रक्तस्राव झाला आणि रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली आहे.
आणखी वाचा