पुणे: पुण्याच्या विमाननगर परिसरातील एका नामांकित आयटी कंपनीत नुकतीच एका तरुणीची हत्या करण्यात आली होती. शुभदा कोदारे (Shubhada Kodare) असे या तरुणीचे नाव होते. तिच्यासोबत काम करणाऱ्या कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय 28 वर्षे) या तरुणाने शुभदावर सुऱ्याने वार करुन तिला ठार मारले होते. या घटनेचा एक VIDEO सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयटी कंपनीतील (Pune IT Company) एका इमारतीच्या खिडकीतून हा VIDEO शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कृष्णा आणि शुभदा स्पष्टपणे दिसत नसले तरी शेवटच्या क्षणांमध्ये त्याठिकाणी काय घडले होते, हे पाहायला मिळत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कृष्णा कनोजा याने आर्थिक व्यवहारावरुन शुभदाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. कृष्णाने शुभदाला तब्बल 4 लाख रुपये दिले होते. मात्र, तिने खोटे कारण सांगून हे पैसे घेतल्याचे समजताच कृष्णा संतापला होता. मंगळवारी शुभदा बसने कंपनीत आली त्यावेळी कृष्णा त्याठिकाणी होता. ने शुभदा जवळ येताच माझ्या पैशाचं तू काय केलंस, असा प्रश्न करत वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर कृष्णाने कोणताही मागचा पुढचा विचार न करता किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या भल्यामोठ्या सुऱ्याने शुभदावर वार करायला सुरुवात केली. त्याने शुभदाच्या अंगावर चार-पाच वार करुन तिला जखमी केले.
शुभदा जखमी होऊन जमिनीवर बसल्याचे व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. त्यावेळी कृष्णा सुरा घेऊन तिच्याभोवती घिरट्या घालत होत्या. यावेळी आजुबाजूला कंपनीतील अनेक कर्मचारी उपस्थित होते. मात्र, कृष्णाच्या हातातील भलामोठा सुरा पाहून कोणाची पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती. कृष्णाने वार केल्यामुळे शुभदा अर्धमेली होऊन जमिनीवर बसली होती. अखेर कृष्णाने तिच्याजवळ जाऊन तिला खाली पाडल्याचे व्हिडीओत दिसत आहे. यानंतर कृष्णाने आपल्याकडील सुरा जमिनीवर फेकून दिला. कृष्णाने सुरा फेकल्यानंतर आजुबाजूचे लोक त्याठिकाणी धावत आले आणि त्यांनी कृष्णाला मारायला सुरुवात केल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. मात्र, हे सगळे घडेपर्यंत शुभदाच्या शरीरातून बरेच रक्त वाहून गेले होते. त्यामुळे रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिने जीव सोडला. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती. यानिमित्ताने पुण्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आणखी वाचा