Pune Covid Updates :  राज्यात कोरोनाने पुन्हा (Corona) डोकं वर काढलं आहे. त्यात ठाणे, पुणे आणि मुंबई शहरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ होत असल्याचे दिसत आहे. यामुळे पुण्यातील काही रुग्णालयांनी पुन्हा एकदा कारोना वॉर्ड सुरू केले आहेत. नोबेल हॉस्पिटल, के. ई. एम रुग्णालय आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात देखील कोरोना रुग्णांना विलिगीकरणात ठेवले जात आहे. रुग्णसंख्या झापाट्याने वाढली तर रुग्णांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच खबरदारी घेतली जात आहे. 


मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढत आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 765 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहे. त्यापैकी फक्त 36 रुग्ण हे उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहे आणि 729 रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहे. मात्र असं असलं तरीही येत्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यांनी पुन्हा एकदा कारोना वॉर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 


सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले की, मार्चमध्ये शहरात कोविड संसर्गामुळे तीन मृत्यू झाले आहेत. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आणि आम्ही दक्षता वाढवत आहोत. आम्ही आमच्या OPD मध्ये स्वॅब कलेक्शन सेंटर्स उपलब्ध केले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी काळजी  करण्याची नाही तर काळजी घेण्याची गरज आहे. 


शहरातील रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या आणि ऑक्सिजनची आवश्यकता याची नियमितपणे तपासणी केली जात आहे. गेल्या महिन्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या तिघांमध्ये 65 वर्षांवरील महिलांचा समावेश होता. यापूर्वीही झालेल्या मृत व्यक्तींना एकापेक्षा जास्त गंभीर आजार होते. 


पुण्यात लसीकरण ठप्प


कोरोनाचे सक्रिय रुग्ण सर्वाधिक असूनही पुणे महापालिकेच्या एकाही रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाा प्रदुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचं आहे. मात्र पुण्यात लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे पुणेकरांना लसीसाठी वणवण फिरावं लागत आहे. नायडू रुग्णालय, कमला नेहरु, ससून हॉस्पिटल, सुतार दवाखाना यासारखा महानगरपालिकेच्या रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. पुढील पाच दिवस लस उपलब्ध होणार नाही आहे, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.