पुणे : कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा पडला आहे, तोही केवळ 2 तास आणि 13 मिनिटात आणि गायब झाले 94 कोटी 42 लाख रुपये. बँकिंग विश्वाला हादरवणारी ही घटना 11 आणि 13 ऑगस्टला घडली आहे. बँकेची टेक्नॉलॉजी, फायरवॉल इतकी मजबूत असताना हा दरोडा पडलाच कसा? आणि हे सगळं होत असताना बँकेला याची कुणकुणही कशी लागली नाही? असा प्रश्न पडला आहे.

खातेदारांची बनावट व्हिसा कार्ड तयार करण्यात आली. ती वापरुन 21 देशात वेगवेगळ्या लोकांनी पैसे काढले. प्रत्यक्षात खऱ्या व्हिसा कार्डचा वापर झाला नाही. त्यापुढे जाऊन हाँगकाँगमधील हॅनसेन बँकेतील एलएम ट्रेडिंग कंपनीतही स्विफ्ट मेसेजिंग सिस्टिमद्वारे 13 कोटी 50 लाख ट्रान्सफर करण्यात आले. जे रिकव्हर करण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे.

जे कॉसमॉस बँकेसोबत झालं, ते इतर कुठल्याही बँकेसोबत होऊ शकतं. बनावट स्विचिंग सिस्टिम तयार करुन पैशांवर दरोडा शक्य आहे.

कॉसमॉस बँक ही सर्वात जुनी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आहे.

- 1906 साली कृष्णाजी गोरे आणि शंकर बर्वेंनी कॉसमॉस बँकेची स्थापना केली

- साहित्य सम्राट एन.सी उर्फ तात्यासाहेब केळकर बँकेचे पहिले अध्यक्ष होते

- 1997 साली बँकेला मल्टिस्टेट स्टेटस बहाल करण्यात आलं

- सात राज्य आणि 140 शाखांमधून बँकेचा कारभार चालतो

- 20 लाखांहून अधिक ग्राहक असलेल्या बँकेत 79 हजार शेअरहोल्ड़र आहेत

- बँकेची वर्षाची उलाढाल जवळपास 18 हजार कोटीच्या आसपास आहे

आता इतक्या मोठ्या बँकेची फसवणूक झाल्यानं ग्राहकांमध्ये भीती पसरणार हे साहजिक आहे.

कॉसमॉस बँकेचा एकूण कारभार पाहता 80 ते 90 कोटी ही मोठी रक्कम नाही. पण डिजिटल दरोडेखोरांची कुणकुण जर दोन तासात लागली नसती, तर काय झालं असतं? जग डिजिटल झालं. दरोडे डिजिटल झाले. पण आता सातासमुद्रापार असलेल्या या महाठगांना बेड्या ठोकणं शक्य आहे का? कानून के लंबे हात दरोडेखोरांपर्यंत पोहोचणार का? हा प्रश्न आहे.