पुणे : पुण्यातील कॉसमॉस बँकेतील खाती परदेशातून हॅक झाल्याचा आरोप होत आहे. परदेशी हॅकर्सनी एकूण 94 कोटी 42 लाख रुपयांचा अपहार केल्याचा दावा बँकेने केला आहे. पुण्यातील चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात अज्ञात हॅकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉंगकॉंगमधून आपल्या बँकेतील खाती हॅक केली आणि तब्बल 95 कोटी रुपयांचा अपहार केला, अशी तक्रार कॉसमॉस बँकेने पोलिसात केली आहे. बँकेने सर्व खातेधारकांचे पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही दिली असून सुरक्षिततेसाठी दोन दिवस बँकेची एटीएम सेंटर बंद राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.
मालवेअर व्हायरसचा वापर करुन कॉसमॉस बँकेच्या व्हिसा आणि डेबिट कार्ड धारकांची माहिती चोरण्यात आली. त्या माहितीच्या आधारे हॅकरने 12 हजार व्यवहार केले. बँक खात्यांमधून परदेशात तब्बल 78 कोटी रुपये, तर भारतात अडीच कोटी रुपये वळते केल्याचा आरोप होत आहे.
80.5 कोटी रुपये 11 ऑगस्टला वळते केल्यानंतर 13 ऑगस्टला असाच प्रकार घडला. कॉसमॉस बँकेतील खात्यांवरुन हाँगकाँगच्या हँसेन बँकेमधे असलेल्या ए. एल. एम. ट्रेडींग कंपनी या नावाने असलेल्या बँक खात्यावर 13 कोटी 92 लाख रुपये वळते करण्यात आले. असे एकूण 94 कोटी 42 लाख रुपये कॉसमॉस बँकेतील खात्यांमधून काढून घेण्यात आले.
पुण्यातील गणेश खिंड रस्त्यावर असलेल्या बँकेच्या मुख्यालयातील ए. टी. एम. स्वीच सर्व्हरवर मालवेअरच्या सहाय्याने हल्ला करुन हॅकिंग करण्यात आलं. बँकेकडून चतुःश्रुंगी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सायबर गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
कसा झाला अपहार?
दोन बँकांमध्ये व्यवहार करण्यासाठी स्विचिंग सिस्टिम असते. मात्र कॉसमॉस बँकेची फसवणूक करण्यासाठी आभासी स्विचिंग सिस्टिम मालवेअरच्या सहाय्याने तयार करण्यात आली. या आभासी स्विचिंग सिस्टिमने कॉसमॉसच्या व्हिसा आणि डेबिट खात्यांमधून 11 ऑगस्टला अवघ्या दोन तास तेरा मिनिटांमधे 12 हजार व्यवहार झाल्याचं दाखवलं.
आभासी स्विचिंग सिस्टिमने मागणी करताच कॉसमॉस बँकेच्या यंत्रणेने पैसे वळते केले. मात्र नंतर ही स्विचींग सिस्टिम खोटी असल्याचं लक्षात आलं. या 12 हजार व्यवहारांमधून तब्बल 80 कोटी 50 लाख रुपये एटीएमधून काढण्यात आले.
या 80 कोटींपैकी 78 कोटी रुपये हे वेगवेगळ्या 21 देशांमधील एटीएम खात्यांमधून काढण्यात आले, तर अडीच कोटी रुपये भारतातील एटीएममधून काढण्यात आले. कॅनडातून मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यात आल्याची माहिती आहे. तर भारतात काढण्यात आलेले पैसे हे प्रामुख्याने मुंबई आणि इंदूरमधून काढण्यात आले.
दुसऱ्या प्रकारात कॉसमॉस सहकारी बँकेच्या खात्यांमधून हाँगकाँगमधील हॅनसेन बँकेत 13.5 कोटी रुपये 13 ऑगस्टला वळते करण्यात आले. त्यासाठीही आभासी स्विचिंग सिस्टिमचा उपयोग करण्यात आला. यामागे आंतरराष्ट्रीय टोळी असण्याचा अंदाज आहे. बँकेने सर्व खातेधारकांचे पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही दिली असून सुरक्षिततेसाठी दोन दिवस बँकेची एटीएम सेंटर बंद राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.