पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशासह राज्यात प्रादुर्भाव दिसून येत आहे. दिवसागणिक समोर येणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणांवरही ताण आला आहे. अशातच उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन, बेड्स आणि रेमडेसिवीर इंजेक्शन यासाठी वणवण करावी लागत आहे. अशातच अनेक समाजकंटक यावेळीही काळाबाजार करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुण्यात मोफत बेडसाठी रुग्णांकडून पुन्हा एकदा एक लाख ऐंशी हजार रुपये लुबाडण्यात आलेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या न्यू भोसरी रुग्णालयात ही धक्कादायक बाब घडली आहे. याप्रकरणी जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बेडसाठी पैशाची मागणी करणाऱ्या आळेफाटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी अमोल पवारला बेड्या ठोकण्यात आल्यात. अशातच महापालिकेच्या न्यू भोसरी रुग्णालयातील कर्मचारीही या प्रकरणात सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस कसून तपास करत आहेत.
23 एप्रिलला सिन्नर येथील एकाच कुटुंबातील तिघाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये आई आणि दोन मुलांचा समावेश होता. पण नाशिक जिल्ह्यात त्यांना बेड उपलब्ध झाला नाही. अनेक ठिकाणी विचारणा केल्यानंतर त्यांना आळेफाटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी असलेल्या अमोल पवार यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आलं. त्याच्याशी संपर्क केला असता, त्याने पिंपरी महापालिकेच्या न्यू भोसरी रुग्णालयात तीन बेड उपलब्ध करून देतो असं सांगितलं. पण तीन बेडसाठी एक लाख ऐंशी हजारांची मागणी केली. महापालिकेच्या रुग्णालयात मोफत बेड मिळतो, याची कल्पना होती. पण तातडीनं बेड उपलब्ध होणं गरजेचं असल्यानं मी पैसे दिले, असं तक्रारदारांनी सांगितलं आहे.
मोफत बेडसाठी बक्कळ पैसे मोजल्यानंतर बेड उपलब्ध झाला, मात्र उपचारावेळी आई आणि दोन्ही मुलं असा तिघांचाही मृत्यू झाला. नातेवाईकांसाठी हा धक्का होता. यातून सावरल्यानंतर पोलिसांत धाव घेत नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करून अमोल पवारला अटक करण्यात आली आहे. पण अमोलने पिंपरी पालिकेच्या न्यू भोसरी रुग्णालयात कोणाशी संपर्क साधला होता? याचा शोध पुणे ग्रामीण पोलीस घेत आहेत.
दरम्यान, यापूर्वी पिंपरी पालिकेच्या ऑटो क्लस्टर कोविड हॉस्पिटलमध्ये असाच प्रकार घडला होता. तेव्हा एका शिक्षिकेला उपचारासाठी बेड हवा होता, त्यावेळी एक लाख रुपये लुबाडले होते. याप्रकरणी चार डॉक्टरांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. पुढे त्यांनी आणखी तीन रुग्णांकडून एक-एक लाखांची मागणी केल्याचंही तपासात समोर आलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mucormycosis : ‘म्युकरमायकोसिस’च्या औषधोपचारासाठी 30 कोटींचा निधी उपलब्ध, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
- Corona Vaccine : पुण्यात शेजारशेजारच्या 'या' गावांमध्ये कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसीची निर्मिती
- कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांकडून एक लाख रुपयांची लूट केल्याप्रकरणी तीन डॉक्टरांना बेड्या. पालिकेच्या तक्रारीनंतर पिंपरी पोलिसांची कारवाई.