Pune Corona Update :  कोरोना पुन्हा एकदा डोकं (Pune Corona Update ) काढत आहे. त्याअनुषंगाने राज्य आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. आज पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात मॉक ड्रिल घेण्यात आलं. त्यासोबत पुण्यातील अनेक रुग्णालयात मॉक ड्रिल (Mock drill) घेण्यात आलं.  कोरोना रुग्णांसाठीचे शंभर बेड सुस्थितीत आहेत का? ऑक्सिजनची व्यवस्था आहे का? स्टाफ तैनात आहे का? याबाबतची चाचपणी यावेळी करण्यात आली. देशासह पुण्यात सध्या कोरोनानं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले होते. पुण्यातील सुमारे 123 रुग्णालयात मॉक ड्रिल घेण्यात आलं. या रुग्णालयातील  5,805 बेडपैकी 2,204 बेड रुग्णालयांमध्ये चांगल्या अवस्थेत आहेत. 


पुण्यातील 123 रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल पार पडलं. त्यात 10 सरकारी आणि 113 खाजगी  रुग्णालयाचा समावेश आहे.  764 पैकी 258 अतिदक्षता विभाग (ICU) बेड तयार आहेत आणि 527 पैकी 228 व्हेंटिलेटर बेड कार्यरत आहेत. तसेच 3,005 पैकी 987 ऑक्सिजन बेड आणि 1,509 पैकी 731 आयसोलेशन बेड कार्यरत आहेत, असं या मॉक ड्रिलनंतर महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. 


आमच्याकडे 2,763 डॉक्टर आणि 7,221 नर्स आहेत आणि सध्या रोज 956 चाचण्या होत आहे. या रुग्णालयांमध्ये 848 आयुष डॉक्टर आणि 2,333 पॅरामेडिकल स्टाफ असून 3 लाख 24 हजार कोरोना चाचणी किट उपलब्ध आहेत, असं पुणे महानगर पालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर यांनी सांगितले. Doxycycline, Paracetamol, remdesivir, tocilizumab आणि methylprednisolone यासारख्या औषधांचा पुरेसा साठा असल्याचंही त्यांनी सांगितलं. 


मागील कोरोना लाटेच्या अनुभवामुळे कोरोनासोबत दोन हात कसे करायचं हे नागरिकांना आणि डॉक्टरांनाही माहिती आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मात्र दीड वर्षापूर्वी कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली होती. तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहे, असं पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांनी सांगितले.


...तर, कोरोना वार्ड पुन्हा सुरु करणार


पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ होत असल्याचे दिसत आहे. यामुळे पुण्यातील काही रुग्णालयांनी पुन्हा एकदा कोरोना वॉर्ड सुरू केले आहेत. नोबेल हॉस्पिटल, के. ई. एम रुग्णालय आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात देखील कोरोना रुग्णांना विलिगीकरणात ठेवले जात आहे. रुग्णसंख्या झापाट्याने वाढली तर रुग्णांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच खबरदारी घेतली जात आहे.