Pune Old Wada News : मागील काही दिवसांपासून पुण्यातील पेठेतील वाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि त्यांच्या नुतनीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच वाड्याच्या प्रश्नांसाठी आता पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी पुढाकार घेतला आहे. पुण्यातील शनिवार वाडा परिसरातील जुन्या वाड्यांचे पुनर्निर्माण करण्यास अनेक अडथळे आहेत. त्यामुळे इथल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करुन मार्ग काढू, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.


पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंच्या 100 मीटर परिसरातील बांधकामांना आणि दुरुस्तीला पुरातत्व विभागाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सदर परिसरातील अनेक बांधकामे धोकादायक परिस्थितीत आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी आज स्थानिकांची भेट घेऊन जुन्या वाड्यांची पाहाणी केली.


या पाहणीनंतर पालकमंत्री पाटील म्हणाले की, पुरातत्व विभागाच्या परिपत्रकामुळे पुण्याचा मध्यभाग असलेल्या शनिवार वाड्याच्या शंभर मीटर परिसरात नव्याने बांधकाम किंवा दुरुस्ती करता येत नाही. शहरातील अन्य ठिकाणीदेखील अशी समस्या येत आहे. याबाबत राज्य शासनाची भूमिका सकारात्मक आहे. मात्र याबाबतचे पुरातत्व विभागाशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित असल्याने त्याबाबतची  माहिती घेऊन बांधकामांना स्थगिती नसल्यास पुरातत्व विभागाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, त्यासाठी स्थानिकांना सोबत घेऊन दिल्लीत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


जुने वाडे जुनेच राहिले..


अनेक वाडे शनिवार वाड्याइतकेच जुने आहेत तर काही शनिवार वाड्याच्याही आधी बांधण्यात आलेत. या वाड्यांची दुरुस्ती करणं आता अशक्य असल्यान ते पाडून नवीन बांधकाम करण्याशिवाय पर्याय नाही, असं वाड्याच्या मालकांचं म्हणणं आहे. यातील अनेक वाड्यांशी इतिहास देखील जोडला गेलाय. अनेक वाडे इथल्या सांस्कृतिक आणि सांगितिक घडामोडींचे केंद्र राहिलेत मात्र पुरातन विभागाच्या जाचक अटींमुळे हा सर्वच इतिहास मातीमोल होत चालला आहे. काही जाचक अटींमुळं या जुन्या पुण्यातून मोठ्या प्रमाणात लोकांनी गेल्या काही वर्षात स्थलांतर केलंय आणि पुण्यातल्या अन्य भागांमध्ये राहायला गेलेत. नुकत्याच झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत इथले तब्ब्ल 15 हजार मतदार कमी झाल्याचं समोर आलं .  शंभर मीटरच्या पुढे शनिवार वाड्यापासून तीनशे मीटर अंतरावर बांधकाम करायच असेल तर इमारतीची उंची कमी राहावी यासाठी एफ एस आयच्या अटी लादण्यात आल्या. त्यामुळे फायदा दिसत नसल्याने बांधकाम व्यवसायिक इथं नवीन इमारती बांधायला पुढं येत नाहीत.