मुंबई: पुण्यातील अपघात प्रकरणी (Pune Porsche Car Accident) बाल न्याय मंडळाने जरी त्या अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्याचा निर्णय घेतला असता तरी त्यामागे असलेल्या पोलिसांच्या भूमिकेवर मात्र संशय उपस्थित केला जात आहे. पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकरांनी तर या प्रकरणात थेट पोलिस आयुक्तांवर आरोप केला आहे. पोलिस आयुक्त हेच या डीलमध्ये सामील असून पोलिसांनी धनाढ्याच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे.


धंगेकरांनी जे काही आरोप केले आहे त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अपघात झाल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी वाचवण्याचा प्रयत्न केला हे अनेक गोष्टींवरून स्पष्ट होतंय. त्यामध्ये सुरूवातीला 304 कलम न लावणं, त्या आरोपीला उशीराने ब्लड टेस्टसाठी नेणं आणि इतर काही गोष्टींमुळे पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जात आहे. 


1. पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा पहिला प्रयत्न पोलीस स्टेशनमध्येच झाला. पोलिसांनी आधी या मुलावर कलम 304 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला. तशी एफआयआर तयार करण्यात आली. मात्र सर्वात आधी 'एबीपी माझा'ने या प्रकरणाला वाचा फोडली. त्यानंतर पोलिसांनी कलम 304 अ बरोबर कलम 304 या कलमाचाही समावेश असलेली दुसरी एफआयआर तयार केली.


2 . कलम 304 अ म्हणजे निष्काळजीपणामुळे एखाद्याच्या मृत्यूला कारणीभूत होणे तर कलम 304 म्हणजे विना हेतू एखाद्याची हत्या करणे. 
 
3. पुणे पोलिसांनी आधी कलम 304 अ चा वापर केल्यानं आणि नंतर त्यामध्ये बदल केल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला.
 
4 . पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा दुसरा प्रयत्न केला तो त्याच्यावर दारू पिऊन गाडी चालवण्याचा गुन्हा नोंद न करून. पुणे पोलिसांनी एफआयआरमध्ये हा मुलगा दारू पिलेला होता हे जरूर सांगितलं. मात्र त्यासाठी आवश्यक कलम 185 हे सुरुवातीला लावण्यात आलं नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणीवसांनी पुण्यात येऊन पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर मंगळवारी या गुन्ह्यात कलम 185 ची वाढ करण्यात आली.
 
5 . पुणे पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला अपघातानंतर  जवळपास अकरा तासांनी वैद्यकीय तपासणीसाठी म्हणजे मेडिकल टेस्टसाठी नेलं. रात्री अडीच वाजता अपघात झाल्यानंतर या मुलाला दुपारी दीड वाजता ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं.  


ही बातमी वाचा: