पुणे : शहरातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या भीषण अपघातावरुन (Pune accident) लोकांममध्ये प्रचंड संताप आहे. बड्या उद्योगपतीच्या बेजबाबदारपणामुळे व त्यांच्या अल्पवयीन मुलामुळे दोन निष्पाप जीव गेले. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर राजकीय दबावातून व पोलीस स्तरावरुन हे प्रकरण दाबण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare) यांनी मध्यस्थी केल्याचाही आरोप होत आहे. विशेष म्हणजे या आरोपावर सुनिल टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिले असून केवळ मला माहिती मिळाली म्हणून मी पोलीस ठाण्यात गेलो होतो, असे त्यांनी म्हटले. मात्र, आता विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांनी थेट भूमिका घेत याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. त्यात अनुषंगाने आमदार सुनील टिंगरेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. दरम्यान, सुनील टिंगरे हे वडगाव-शेरीचे आमदार आहेत. 


वचिंत बहुजन आघाडीच्यावतीने अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार देण्यात आली आहे. वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत आमदार सुनील टिंगरेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सुनील टिंगरे यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्याची मागणी वंचितकडून होत आहे. दरम्यान, याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन कोणालाही सोडणार नसल्याचं म्हटलं आहे. तर, अल्पवयीन मुलास बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं असून आरोपी विशाल अग्रवाल यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 


पुण्यातील कल्याणी परसरात रविवार 19 मे रोजी मध्यरात्री 2 ते 2.30 च्या सुमारास घडलेली घटना अतिशय निंदनीय असून, त्यामध्ये पुण्यात काम करत असलेल्या दोन निष्पाप जिवांचा (अनिष व अश्विनी) बळी गेला आहे. पोलिसांनी केलेल्या तोकड्या कारवाईमुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद व प्रतिमा मलीन झाली आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या निष्पाप तरूण-तरूणीला न्याय देण्यासाठी आरोपीवर लावलेल्या भारतीय दंड संहिता (IPC Act.) मध्ये वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 


वंचितच्या मागण्या


1. आरोपीवर ३०४ व ३०४ हे कलम लावण्यात यावे.
2. ज्या शोरूमच्या मालकाने गाडीचे रजिस्ट्रेशन न करता कार मालकाला दिली त्यालाही
या गुन्हयामध्ये सहआरोपी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा.
3. सरकारी कामात चुकीच्या पध्दतीने हस्तक्षेप करणाऱ्या (गुन्हा दाखल होवू नये म्हणून पोलीसांवर दबाव टाकणाऱ्या सुनील टिंगरे यांचेवर 353 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा. 4. पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत चालणारे सर्व हॉटेल्स, पव, यांचे परवाने (लायसंन्स) तपासणी करून अवेळी चालणाऱ्या पब व हॉटेल्सवर कडक कारवाई करण्यात यावी.
5. पुणे शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यात यावे, अशा विविध मागण्या वंचितच्या वतीने करण्यात आल्या आहेत. तसेच, पक्षाच्या वतीने संपूर्ण पुणे शहरात तीव्र प्रकारचे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 
 
वंचितचे पुणे शहर अध्यक्ष मुनव्वर कुरैशी यांनी पदाधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन ह्या मागण्या केल्या आहेत. 


सुनिल टिंगरेंनी मांडली भूमिका


पुण्यातील अपघात  घटनेत दबाव आणल्याचा आरोप झाल्यानंतर आमदार सुनील टिंगरे यांनी आपली बाजू मांडली. माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी म्हटलं. रविवारी रात्री 3 वाजून 21 मिनीटांनी मला माझ्या स्वीय सहाय्यकांचा फोन आला होता. आपल्या मतदारसंघात कल्याणनगर भागात मोठा अपघात झालाय. त्यानंतर मला विशाल अग्रवाल यांचाही फोन आला. त्यांच्याकडून माहिती देण्यात आली. त्यांनी मला सांगितलं की, माझ्या मुलाचा अपघात झालाय. पब्लिकने त्याला मारहाण गेली आहे. त्यानंतर मी घटनास्थळी गेलो. तिथून पोलीस स्टेशनला गेलो, असे सुनील टिंगरे यांनी म्हटलं होतं. मात्र, सुनील टिंगरेंच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.