Ravindra Dhangekar : गिरीश बापट यांच्याकडून रवींद्र धंगेकर यांना खास टिप्स; म्हणाले कधीही सांग...
कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी निवडूण आल्यावर सकाळीच भाजप खासदार गिरीश बापटांची भेट घेतली.
Ravindra Dhangekar : कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज (3 मार्च) भाजप खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. गिरीश बापट यांना भेटण्यासाठी महात्मा फुले संग्रहालय रवींद्र धंगेकर इथे आले होते. यावेळी दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसनेते अंकुश काकडेदेखील होते. अडचण येईल तेव्हा मला सांग मी मदत करेन, असं गिरीश बापट धंगेकरांना म्हणाले. छान काम कर, असाही सल्ला त्यांनी दिला.
भेटीनंतर धंगेकरांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, "आमदार झाल्यानंतर गिरीश बापटांची भेट घेणार मी हे कालच सांगितलं होतं. त्यानुसार मी आज गिरीश बापटांची भेट घेतली. भाजप वेगळं राजकारण करत आहेत. मात्र त्यांनी मला मदत करेन म्हणून सांगितलं. ते मला म्हणाले की कधीही अडचण येईल त्यावेळी मला सांग मी मदत करेन. त्यांनी मला माझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, असं त्यांनी सांगितलं.
तर भाजपने बापटांवर संशय घेतला असता...
पुढे ते म्हणाले की, "मी दोन वेळा बापट यांच्याविरोधात निवडणूक लढवली. ती निवडणूक खेळीमेळीत झाली होती. मात्र यावेळी भाजपने वेगळं राजकारण केलं. आज माझं मन भरुन आलं आम्ही कधीही कुरघोडी केली नाही. ते आजारी होते हे सगळ्यांनाच माहिती आहे. मला त्यांना भेटायचं होतं. मात्र मी त्यांना भेटायला निवडणुकीदरम्यान आलो असतो. तर भाजपने त्यांच्यावर संशय घेतला असता. त्यामुळे मी आधी निवडणूक जिंकून भाजपला दाखवून दिलं आणि मगच गिरीश बापटांच्या भेटीला आलो."
गिरीश बापटांनी धंगेकरांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक भाजप-मविआने प्रतिष्ठेची बनवली होती. दोन्ही पक्षांतील बड्या नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी कसब्यात हजेरी लावली होती. रवींद्र धंगेकरांना हरवण्यासाठी भाजपने डझनभर नेते पुण्यात आणले होते. काही नेते अनेक दिवस तळ ठोकून होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनीही पुण्यात सभा रोड शो घेतले. तरीही रवींद्र धंगेकरांनी विजय खेचून आणला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत सगळ्यांचे आभार मानले आणि लगेच गिरीश बापटांचा आशिर्वाद घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
भाजपवर गिरीश बापट नाराज?
गिरीश बापटांनी या प्रकृतीचं कारण देत पोटनिवडणुकीचा प्रचार करणार नाही असं पत्र काढून जाहीर केलं होतं. त्यानंतर ते भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते आजारी असतानाही प्रचारात उतरले. त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात हजेरी लावली. व्हिलचेअर, ऑक्सिजन आणि नाका नळ्या घालून त्यांनी प्रकार केला. त्यांच्या तब्येतीची काळजी न करता त्यांचा प्रचाराचा वापर केला जात असल्याच्या टीका विरोधकांनी केल्या होत्या.