Pune Bypoll Election : पुण्यातील कसबा मतदारसंघाची पोटनिडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून बॅनरबाजीमुळे चर्चेत आहे. कसब्यात लावण्यात आलेल्या बॅनरची चर्चा राज्यभर रंगली. त्यानंतर आता प्रचार आणि मतदानानंतर थेट विजयी आणि अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मात्र काही वेळानंतर ते बॅनर हटवण्यातही  आले. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी या बॅनरबाजीमुळे शहरात चांगलीच चर्चा रंगली.


कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) आणि कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यात चांगलीच चुरस आहे. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी बडे नेते रस्त्यांवर उतरले होते. आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी अतिउत्साहीपणा दाखवल्याचं समोर आलं आहे. दोघांच्याही कार्यकर्त्यांनी निकालापूर्वीच अभिनंदनाचे बॅनर्स लावले आहेत. कसब्यातील वेगवगेळ्या परिसरात असे बॅनर्स लावले आणि काही वेळातच हे बॅनर्स काढून टाकण्यात आले.


सारसबागेसमोर आणि आंबेगाव बुद्रुक परिसरात हे बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनरवर आपल्या हक्काचा माणूस वगरे लिहिण्यात आलं आहे. त्यासोबतच पुण्यातील मुख्य वस्तीत लागले हेमंत रासने आमदारपदी निवड झाल्याचे बॅनर लावले आहेत. पुण्यात पोटनिवडणुकीचा निकाल लागण्याआधीच बॅनरबाजीला उधाण आलं आहे. 


दोघांवर गुन्हे दाखल


निवडणुकीचा प्रचार संपल्यावर प्रचार केल्यामुळे आणि आचारसंहितेचा भंग केल्यामुळे हेमंक रासने आणि रवींद्र धंगेकर या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर हेमंत रासने यांनी प्रचार केला आणि धंगेकरांनी प्रचार संपल्य़ावर उपोषण केल्याने दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली पाटील यांनी EVM मशीनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दोघांकडून प्रचारावर खर्च किती?


पैसे वाटपाचे आरोप होत असताना विरोधी पक्षांनी एकमेकांवर या गैरव्यवहाराचे आरोप केले. त्यामुळे कसब्यात रवींद्र धंगेकरांनी उपोषण केलं. त्यासोबतच एकमेकांवर टीकेचे बाण सोडले. मात्र जर खर्च पाहिला तर त्यात फक्त दोन्ही उमेदवार मिळून 20,54,205 रुपये खर्च केला आहे. अधिकृत उमेदवारांमध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी 11 लाख 60 हजार 029 रुपये तर भाजपचे हेमंत रासणे यांनी 8 लाख 94 हजार 176 रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. दोन्ही निवडणूक खर्चाच्या कमाल मर्यादेपेक्षा हा खर्च खूपच कमी आहेत. निवडणूक निरीक्षक उमेदवार आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाच्या पडताळणीचे तीन टप्पे घेत आहेत.