पुणे : पुण्याच्या नसरापूरमध्ये कोर्टानं ज्या व्यापाऱ्याला त्याचे बैल गोशाळेतून नेण्याची मुभा दिली होती. त्याच व्यापाऱ्याला अखिल भारतीय कृषी गोसेवा केंद्राच्या कार्यकर्त्यांनी अमानुष मारहाण केली. महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदीचा कायदा झाल्यानंतर व्यापाऱ्यांना दहशतीत जगावं लागत आहे.

 
नसरापूरच्या नूरजंग शेखच्या अंगावरचे वळ बघून अंगावर काटा आल्याशिवाय राहात नाही. नूरजंग जनावरांच्या खरेदी विक्रीचा आणि शेतीचा व्यवसाय करतो. त्याच्या शेतात 6 बैल होते. ते गोरक्षकांनी ओढून नेले. त्यांना सासवडजवळच्या गोशाळेत ठेवण्यात आलं. शेख यांनी कोर्टात दाद मागितली. निकाल नूरजंग यांच्या बाजूनं लागला.

 

 

निकालाची प्रत घेऊन जेव्हा नूरजंग शेख पोलिसांसकट बैल परत मिळवण्यासाठी सासवडच्या गोशाळेत गेले, तेव्हा चालक कुलुप लाऊन गोशाळेचा चालक फरार झाला. त्यामुळे पोलिसांनी गोशाळेवरही गुन्हा दाखल केला. ही माहिती गोशाळा चालकानं शिवशंकर स्वामीला दिली. त्यानंतर किकवी गावातून घरी निघालेल्या नूरजंग शेख यांना गाठून स्वामी आणि त्याच्या साथीदारांनी अमानुष मारहाण केली.

 
11 जुलै 2015 ला घडलेल्या या घटनेनंतरही शिवशंकर स्वामी मोकाट आहे. पुणे आणि परिसरात अखिल भारतीय कृषी गो सेवेच्या कार्यकर्त्यांना मिलिंद एकबोटेंचं अभय आहे. कुठंही जनावरं सापडली, मांस सापडलं की कार्यकर्ते टेंपो चालकाला मारहाण करतात. गुन्हे दाखल झाल्यानंतर पत्ताही थेट एकबोटेंच्या बंगल्याचाच. महाराष्ट्रात गोवंश हत्येला बंदी केल्यापासून तथाकथित गोरक्षकांचा सुळसुळाट झाला आहे. कायदेशीर पावत्या, परवाने घेऊनही जीवाला धोका असतो. त्यामुळे व्यापारी दहशतीत आहेत.

 
उनाच्या मारहाणीनंतर मोदींनी उद्विग्नपणे दलितांआधी आपल्याला गोळ्या घाला, असं वक्तव्य केलं. बोगस गोरक्षकांवर निशाणा साधला. गाईचा संवेदनशील मुद्दा पाहता, पोलीसही गोरक्षकांच्या वाकड्यात जात नाहीत. बऱ्याचदा व्यापाऱ्याची बाजू ऐकलीही जात नाही. त्यामुळं आता दाद कुणाकडं मागायची? व्यवसाय कसा करायचा? आणि बोगस गोरक्षकांपासून जीव कसा वाचवायचा? याचं कोडं कायम आहे.