Pune-Bengaluru Greenfield Corridor: पुणे-बेंगळुरू ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमुळे या दोन शहरांमधील अंतर 95 किमीने कमी होणार आहे. शिवाय प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होणार आहे. ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमध्ये इमर्जन्सी लँडिंगसाठी दोन पाच किमीच्या एअरस्ट्रिप असतील. वाहनचालकांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे, लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान, महामार्गाच्या बाजूला हॉटेल्स असतील. महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठी झाडेही लावण्यात येणार आहेत.विमानाची धावपट्टी असलेला हा राज्यातील पहिला राष्ट्रीय महामार्ग ठरणार आहे.
देशातील निवडक मार्गांवर ‘भारतमाला’ प्रकल्प दोन अंतर्गत जवळपास तीन हजार किमीचे रस्ते बांधले जात आहेत. हे सर्व रस्ते ग्रीनफिल्ड असणार आहेत. त्यात पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील सविस्तर प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) काम येत्या काही दिवसांत संपणार आहे. कर्नाटक राज्यात सुरू असलेले कामही येत्या काही महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ग्रीनफिल्ड कॉरिडॉर हा पूर्णपणे नवीन एक्सप्रेस वे असणार आहे. त्यात जुना रस्ता रुंदीकरणाचा समावेश नाही. ताशी 120 किमी वेगाने वाहने धावतील. चार, सहा आणि आठ थर आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली जाणार आहेत.
ग्रीनफिल्ड कॉरिडॉर म्हणजे नेमकं काय?
मुख्य रस्ते सोडून हिरव्यागार परिसरातून जो महामार्ग तयार केला जातो. त्याला ग्रीनफिल्ड कॉरिडॉर किंवा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस- वे म्हटलं जातं. ज्या परिसरात पुर्वी कधीच रस्ता नव्हता त्या ठिकाणी या रस्त्याचं नियोजन केलं जातं. या परिसरात जमीन स्वस्त दरात उपलब्ध होते आणि त्या परिसरातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. या हेतूने काही विशिष्ठ परिसरातून या मार्गाचा आराखडा तयार केला जातो.
कसा असेल हा मार्ग?
वारवे बुद्रुकपासून ग्रीनफिल्ड सुरू होणार आहे. या मार्गाला सहा लेन असणार आहे. संपूर्ण रस्ता डांबरी आहे. सिमेंटचा वापर होणार नाही आहे. हा मार्ग सांगली, सातारा आणि कोल्हापूरसह इतर शहरांमधून थेट जाणार नाही. टोल स्टेशनपासून जवळच्या गावांमध्ये जाण्यासाठी रस्ता असेल. वाहतूक विस्कळीत न होता आपत्कालीन परिस्थितीत विमान थेट महामार्गावर उतरवण्यासाठी पुणे आणि बंगळुरूजवळ पाच किमीचा विमान धाव पट्टी असेल. प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 31,000 कोटी रुपये आहे