Pune banner war: पुण्यात अनेकदा राजकीय पोस्टरबाजी बघायला मिळते. मात्र यंदा दोन्ही आजी माजी उपमुख्यमंत्र्यांवरुन बॅनरबाजी करुन दोन गटात राजकीय दोषारोप सुरु आहेत. पुण्यात विविध ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहे. त्यात अलका चौकात आमने-सामने हे बॅनर लावले असल्याने भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही गटात चर्चा रंगू लागली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. त्यामुळे पुण्यातील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्ये दरवर्षी मोठ-मोठे बॅनर लावून शुभेच्छा देतात. दोन्ही नेत्यांचे चाहते प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे या प्रकारची बॅनरबाजी दरवर्षी बघायला मिळते. यावर्षी मात्र सत्तापालट झाल्याने विरोधी पक्षात रोष निर्माण झाला आहे.
पुण्यातील भाजपच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी पुण्यातील विविध परिसरात देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत. निष्कलंक नेतृत्व, निर्विवाद कर्तुत्व असा त्यांचा उल्लेख केला आहे. तर राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ‘बैठका होतील… ताफा दिसेल… पण… अशी धडाडी तिथे नसेल असं लिहत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे 'एकच पालक' असा उल्लेख देखील या बॅनरमध्ये करण्यात आला आहे.
हजरजबाबी दोन्ही नेते
अजित पवारांची भाषण शैली अनेकांना आवडते तर देवेंद्र फडणवीसांचा हजरजबाबीपणा अनेकांना भावतो. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या भाषणाला पुण्यात गर्दी असते. दोन्ही नेते पुणेकरांना आवडतात. एकमेकांविरोधात विधानं, एकमेकांवर केलेली टोलेबाजी, एकमेकांना विचारलेले प्रश्न आणि एकमेकांच्या कामाचं केलेलं कौतुक कायम चर्चेचा विषय बनतो. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असतं. त्यांच्या याच स्वभावामुळे दोन्ही नेते लोकप्रिय आहेत. मात्र पुण्यात केलेल्या या बॅनरबाजीवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्वाचं आहे.