पुणे : पुण्यातील देवाच्या आळंदीत (Alandi) हिमनदी अवतरली हे ऐकून आश्चर्य वाटेल. पण इंद्रायणी नदीत तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वारकरी सांप्रदायासाठी पवित्र मानल्या जाणारी इंद्रायणी अक्षरशः फेसाळली (Pune Indrayani Water River Pollution) आहे. वारकरी अन स्थानिकांच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे. याला नेमके कोण जबाबदार आहेत असा प्रश्न आता विचारला जातोय.
इंद्रायणी नदीतील दृश्यं पाहिली तर तुम्हाला वाटेल की ही हिमनदी आहे. पण थोडं थांबा, कारण ही तर वारकरी सांप्रदायाचं श्रद्धास्थान असणारी पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदी आहे. या नदीत हा साबणासारखा फेस वाहणं हे नित्याचंच झालंय. या पापाचे धनी आहेत पिंपरी चिंचवडमधील विनापरवाना चालणाऱ्या शेकडो कंपन्या. ज्या कंपन्या रसायनयुक्त पाणी या नदी पात्रात सोडतात, त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी पुन्हा जोर धरत आहे.
आषाढी वारी, कार्तिकी एकादशी अशा प्रसंगी लाखो वारकरी आळंदीनगरीत दाखल होतो. तेव्हा याच इंद्रायणी नदीत ते पवित्र स्नान करतात अन् तीर्थ म्हणून हेच रसायनयुक्त पाणी पितात. पण आता वारकरी अन स्थानिकांना या पाण्यामुळं आजार जडत आहेत. गेल्या सात वर्षांपासून अनेकदा अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तशा तक्रारी ही करण्यात आल्या आहेत.
फक्त आषाढीलाच राज्यकर्त्यांना इंद्रायणीची आठवण
महाराष्ट्र प्रदूषण मंडळ या इतक्या गंभीर विषयाची जबाबदारी घ्यायला कधीच तयार नसतं. तर दुसरीकडे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अन् उद्योग मंत्री यांना ही केवळ आषाढी वारी, कार्तिकी एकादशी अन संजीवन समाधी सोहळ्यावेळीच याची आठवण होते. लाखो वारकाऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या या इंद्रायणी नदीबाबतची ही उदासीनता कधी दूर होणार? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
एकीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार केवळ आश्वासनं देण्यावर धन्यता मानत आहे. इंद्रायणी नदीने मोकळा श्वास घ्यावा एवढी माफक अपेक्षा ठेवणाऱ्या वारकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचं पाप त्यांच्या माथी पडतंय, याचा मात्र त्यांना विसर पडलाय.
ही बातमी वाचा: