पुणे : पुणे - बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर (Pune Banglore Highway) दरी पुलावर चार वाहनांचा अपघात झाला आहे. मोठ्या कंटेनरनची लक्झरी बस,टेम्पो आणि कारची धडक झाली आहे. घटनास्थळी पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाची चार वाहने दाखल झाली असून अडकलेल्या दोन गंभीर जखमींना बाहेर काढत रुग्णालयात रवाना केलं आहे. पावणे चार वाजताच्या सुमारास नवले पुलाजवळ हा अपघात घडला आहे. 


साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने हा कंटेनर समोरच्या टेम्पोवर जाऊन आदळला आणि त्यानंतर डिव्हायडर तोडून समोरच्या लेनवर पलटी झाला.  समोरच्या लेनवरुन सातारच्या दिशेने निघालेल्या बसला देखील या कंटेनरची धडक बसली. बसमधील काही प्रवासी यामुळे किरकोळ जखमी झाले आहेत आणि दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.


अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. त्यांनी अपघात पाहताच बचावकार्याला सुरुवात केली. अडकलेल्या दोघांना गंभीर अवस्थेत बाहेर काढलं. या अपघातामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली.


अपघाताचं सत्र संपेना…


पुण्यात अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. वाहनाच वेग आणि ब्रेक फेल होऊन अपघात होण्याचं प्रमाण जास्त आहे. या अपघातावर अनेक उपाययोजना सुरू आहेत मात्र तरीही अपघात थांबायचं नाव घेत नाही आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे बंगळूरू हायवेवर नवले पुलाजवळ विचित्र  अपघात झाला होता.कात्रज चौकाकडून (Pune Navale Bridge Accident)  येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या ट्रकने नवले पुलाजवळ चौकात सिग्नलला उभ्या असणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांना जोराची धडक दिली होती. यात महाराष्ट्र शासनाच्या गाडीचा देखील समावेश होता. सिग्नलला उभ्या असणाऱ्या पाच वाहनांनाही जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता.


आतापर्यंत 70 हून अधिक जणांचा जीव घेतला


या हायवेवर अपघाताची संख्या फार आहे त्यासोबतच अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्याही जास्त आहे. सन 2014 पासून आतापर्यंत दरी पूल ते नवले पूल आणि धायरी पूल या साडे तीन किलोमीटरच्या अंतरात तब्बल 186 अपघात झाले आहेत. या अपघातांमधे आतापर्यंत 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 145 हून अधिक जण जखमी झाले आहेत.


हे ही वाचा:


Pune News : कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंत 'जरा धीरे चलो'; जड वाहनांना नवी वेगमर्यादा अन्यथा...