Pune Airport Controversy : पुणे विमानतळाच्या मुद्यावरून राजकारण सुरु झालं आहे. या विमानतळाच्या विलंबाला पवार कारणीभूत असल्याची सूचक वक्तव्यं भाजप नेत्यांनी केली आहेत. पुणे विमानतळ प्रश्नी भाजपचं शिष्टमंडळ आज विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटलं. विमानतळाबाबत अडचणी दूर करण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिल्याची माहिती भाजप नेत्यांनी दिली आहे. त्यावेळी त्यांनी आघाडी सरकारवरही टीका केली.


पुण्याच्या विमानतळावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. राज्यात सरकार बदलल्यानं विनाकारण या विमानतळाच्या कामाला विलंब झाला, अशी टीका भाजपकडून केली जात आहे. महाविकास आघाडी सरकारनं हे पाप केलं आहे, अशी टीका विनय सहस्त्रबुद्धे यांनी केली आहे. तसेच, विमानतळाच्या मूळ प्रस्तावाला महाविकास आघाडीकडून आडकाठी करण्यात येत असल्याचा आरोपही प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. 


पुण्यातील विमानतळाचं स्थलांतर होणार नाही : गिरीश बापट 


भाजप खासदार गिरीश बापट यासंदर्भात बोलताना म्हणाले की, "पुण्याचे खासदार आणि विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी पुण्यातील विमानतळ स्थलांतर करणार नाही अशी घोषणा आज केली. पुणे लोहगाव विमानतळ हे मध्यवर्ती आहे. पहिल्यापासून हा लष्करी भाग आहे. पुण्याचा विस्तार, व्यापार, विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येसोबतच एक सांस्कृतिक शहर म्हणून पाहताना प्रवासी संख्या वाढत आहे. पुण्यात 70 ते 80 हजार पेक्षा जास्त प्रवासी वर्षाला प्रवास करत असतात. पुरंदर, बारामती विमानतळ याला विरोध नाही, उलट ते प्रगतीचे लक्षण आहे. पण पुणेकरांना बाकीची विमानतळं सोयीची नाहीत. पण पुण्यातील विमानतळाचं स्थलांतर होणार नाही. इथल्या सुविधा वाढवल्या जातील."


"कार्गो आधी लहान होता, आता तो देखील मोठा करण्यात येईल. येणाऱ्या काळात एका तासात 2300 लोकं ये जा करतील. 14 विमान इथे पार्क करण्यात येतील. शरद पवारांनी जो प्रस्ताव आणला आहे. त्याचा विरोध नाही त्याचं स्वागतच आहे. पश्चिम महाराष्ट्राला त्याचा उपयोग पण होईल पण लोहगाव विमानतळ विस्तारीकरण होईल. येथील दळणवळण सुरळीत व्हावं, या हेतूनं हा प्रयत्न आहे. लष्करी विमानतळ आहे. मात्र सिव्हील विमानतळ हे राहील." , असंही गिरीश बापट म्हणाले. 


आडकाठी आणण्याचं काम महाविकास आघाडी करतंय : प्रकाश जावडेकर 


प्रकाश जावडेकर बोलताना म्हणाले की, "पुण्यातील होऊ घातलेल्या विमानतळांसंदर्भात ज्योतिरादीत्य शिंदे यांची भेट घेतली. सध्याच्या एअरपोर्टमधील कार्गो हब हलवण्यासाठी डिफेन्सनं जागा देऊ केली आहे. पुणे विमानतळ टर्मिनल नवे आणि जोडले जाईल. पुणे विमानतळाच्या अडचणी सांगितल्या. त्या सोडवण्याचं सिंधियांनी मान्य केलं आहे. पुरंदरच्या जागेसंदर्भात सर्व परवानग्या मिळाल्या होत्या. परंतु सरकार बदलल्यानंतर विनाकारण लांबवण्याचा खेळ चालू आहे. पूर्वी मंजूर केलेल्या जागेवर लगेच कार्यवाही सुरू करता येईल. महाराष्ट्र सरकारनं मूळ प्रस्तावाला मान्यता द्यावी."