पिंपरी चिंचवड : भारताला मिळालेलं स्वातंत्र्य अहिंसेच्या मार्गाने नव्हे तर क्रांतिकारक चळवळीने मिळालं. हे पटवून देताना वारकरी सांप्रदायाचे बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधींचा उल्लेख म्हातारा असा केला. अन् पुन्हा एकदा बंडा तात्यांची जीभ घसरली. या म्हाताऱ्याच्या पद्धतीनं भारताला स्वराज्य मिळवायला एक वर्ष लागलं असतं, असं लोकमान्य टिळकांचं एक वाक्य असल्याचं ही बंडा तात्या म्हणालेत. स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनी ते पुण्यातील खेड राजगुरूनगर येथे बोलत होते.  


बंडा तात्या कराडकर नेमकं काय म्हणाले...


बंडा तात्या कराडकर म्हणाले की, दहा वर्षाच्या काळात भगतसिंहानी केलेली क्रांती ही अभूतपूर्व होती. त्या काळात सुरुवातीला भगतसिंहांवर महात्मा गांधींची छाप होती. महात्मा गांधींचा अहिंसावाद भगतसिंहांच्या मनामध्ये ठासवला होता. आपल्याला हे स्वातंत्र्य अहिंसक मार्गाने मिळवायचं आहे, पण भगतसिंहांचा हा भ्रमाचा भोपळा तीन वर्षातच फुटला. 1922ला एक हत्याकांड झालं, त्या हत्याकांडात त्याला समर्थन देण्यात महात्मा गांधींनी नकार दिला. तेव्हा भगतसिंह महात्मा गांधींवर नाराज झाले. महात्मा गांधींचा अहिंसावाद आणि हिंदुत्व हे दोन्ही ही पक्षपातीच आहेत. पण त्या विषयात आत्ता आपण घुसायचं काही कारण नाही, असं कराडकर म्हणाले. 


बंडातात्या कराडकर म्हणाले की, भगतसिंहांच्या मनावर हा परिणाम झाला, की आता या म्हाताऱ्याच्या 'या' मार्गाने जायचं काही कारण नाही. त्यानंतर ते क्रांतिकारक बनले. हे उपयोगाचं नाही, कारण लोकमान्य टिळकांचं एक वाक्य आहे. या म्हाताऱ्याच्या पद्धतीनं जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर एक हजार वर्षे लागतील. शेवटी आपल्याला हे माहीत आहेच 1947साली आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे अहिंसेच्या मार्गाने मिळालेलं नाही. 1942ला जी क्रांतिकारक चळवळ उभी राहिली, चले जाओ क्विट इंडिया. त्यामध्ये पोलिसांची कार्यालये, सरकारी कार्यालय पेटवणं, रेल्वे रूळ उखडणे या ज्या घटना घडत गेल्या. यातून इंग्रजांनी बोध घेतला, की आता भारत देश सोडल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कुठंतरी असं सांगितलं जातं की 'साबरमती के संत तुने कर किया कमाल, दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल.' असं म्हणणं म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्यामध्ये आपल्या प्राण्यांच्या आहुत्या दिल्यात, अशा साडे तीनशे लोकांचे फोटो इथे मागे आहेत. त्या साडे तीनशे लोकांच्या संपूर्ण क्रांतीचा अपमान केल्यासारखं आहे, असं कराडकर म्हणाले.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha