(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Airline : विमान प्रवासासाठी विमानतळावर आता 3 तास आधी पोहोचा; विमानतळ व्यवस्थापनाचं आवाहन
विमान प्रवासासाठी 3 तास आधी विमानतळावर हजर राहण्याचं आवाहन पुणे विमानतळ व्यवस्थापकाकडून करण्यात आलं आहे. त्यांनी ट्विट करत हे आवाहन प्रवाशांना केलं आहे.
Pune Airline : विमान प्रवासासाठी 3 तास (Pune) आधी विमानतळावर (Airline) हजर राहण्याचं आवाहन पुणे विमानतळ व्यवस्थापनाकडून करण्यात आलं आहे. त्यांनी ट्विट करत हे आवाहन प्रवाशांना केलं आहे. पुणे विमानतळावर गर्दी होत असल्याने विमानतळ व्यवस्थापनाने नागरिकांना हे आवाहन केलं आहे. भारतात प्रवास करण्यासाठी 2 तास तर विदेशात प्रवास करण्यासाठी तीन तास आधी विमानतळावर पोहचण्याच्या सूचना केल्या आहेत.
डिसेंबर महिना सुरु आहे. त्यामुळे ख्रिसमसच्या सुट्ट्या अनेकांना मिळतात. या सुट्ट्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच नवीन वर्षाच्या आगमनासाठीदेखील अनेक प्रवासी विदेशाचा दौरा करतात. त्यामुळे विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामुळे विमानतळावर काहीसा ताण निर्माण होतो. हा ताण कमी करण्यासाठी व्यवस्थापन सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. सिक्युरिटी चेकसाठी सीआयएसएफ जवानांची संख्या वाढवली जात आहे. प्रवाशांनी देखील 3 तास आधी विमानतळावर पोहोचावे यामुळे "चेक इन" करायला वेळ लागणार नाही या संबंधीचे आदेश आम्ही विमान कंपन्यांना दिले आहेत, अशी माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली आहे.
यावर्षी प्रवाशांची संख्या जास्त
कोरोनानंतर यंदा ख्रिसमस नवीन वर्ष जल्लोषात साजरा होणार आहे. नवीन वर्षाचा उत्साह अनेकांमध्ये बघायला मिळत आहे. अनेकांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे दोन्हीचं सेलिब्रेशन करण्यासाठी नागरिक आतुर आहे. यात विदेशी प्रवासाचं प्रमाण वाढलं आहे. या वर्षी डिसेंबर महिन्यात दररोज साधारण 28 हजार प्रवशांची ये-जा होत आहे. मागील वर्षी या काळात हीच संख्या वीस हजारांच्या घरात होती.
विदेशी विमानसेवा सुरु झाल्याने ताण
यावर्षी पुणे-सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मान्यता मिळाली आहे. 2 डिसेंबरपासून ही विमानसेवा सुरु झाली आहे. त्यासोबतच पुणे-बँकॉक सेवा सुरु झाली आहे. त्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या विमानसेवा सुरु झाल्याने अनेक प्रवाशांना फायदा झाला आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनावर प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात चेक इनचा ताण येत आहे. प्रवाशांचा प्रवास सुरळीत करण्यासाठी दोन तास आधी पोहोचण्याचं आवाहन विमानतळ प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
पुण्यातून जर्मनी , इंग्लंड आणि अमेरिकेसाठी विमानसेवा सुरु होणार
पुण्यातून थेट जर्मनी , इंग्लंड आणि अमेरिकेसाठी विमानसेवा सुरु होणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे काही दिवसातच ही सेवा सुरु होणार आहे. त्यासोबतच पुणे विमानतळावरील प्रवाशांची रोजची गर्दी लक्षात घेऊन आम्ही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पुण्यातील आठ स्लॉट वाढवण्याची विनंती केली आहे. तब्बल 14 स्लॉट वाढवले. त्यामुळे आता विमानतळावरील गर्दी कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचे शिंदे म्हणाले.
हेही वाचा