Pune Accident :  पुण्यात मागील काही दिवस  (Pune Accident News) झाले अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताने अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. त्यातच आज झालेल्या एका अपघाताने अनेकांच्या अंगावर काटा आणला आहे. आपल्या लाडक्या लेकीला पोलीस व्हायचं स्वप्न असल्याने तिला पोलीस भरतीसाठी पुण्यामध्ये घेऊन आलेल्या एका वडिलांवर  काळाने घाला घातला. अपघातात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरेश सखाराम गवळी (वय 55) असे मृत्यू झालेल्या वडिलांचं नाव आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघेही नाशिकमध्ये राहत होते. 


सुरेश सखाराम गवळी यांचं लेकीला पोलीस बनवायचं स्वप्न होतं. त्यामुळे त्यांची लेक पोलीस भरतीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करते. पोलीस भरतीची तारीख कळल्यानंतर आपल्या लेकीला सुरेश गवळी आणि त्यांची पत्नी  नाशिकहून पुण्याला घेऊन आले. काल रात्री पुण्यामध्ये उतरल्यानंतर त्यांनी पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरातील फुटपाथवर मुक्काम देखील केला. पहाटे दोनच्या दरम्यान मुलीचे ग्राउंड असल्याने मुलीला ग्राउंडवर सोडायला देखील गेले. मुलीला रात्री ग्राउंडवर सोडल्यानंतर शिवाजीनगर परिसरातून हॉटेल प्राईडच्या दिशेने चहा पिण्यासाठी म्हणून हे सुरेश गवळी निघाले असताना काळाने त्यांच्यावरती घाला केला. 


अचानक समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने सुरेश गवळी यांना उडवलं आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहे. या घटनेसंदर्भातील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याचं काम सुरु आहे. सीसीटीव्हीचा माध्यमातून वाहनचा  शोध घेतल्यानंतर आरोपीचा शोध घेणार आहे. 



अपघाताचं सत्र थांबेना
पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी भोर परिसरात एका बसने पेट घेतला होता. थोड्या प्रमाणात या आगीची चाहूल लागताच चालकाने सर्व प्रवाशांना बाहेर काढलं होतं. त्यानंतर बसमध्ये अचानक भडका उडाला होता. या चालकांच्या प्रसंगावधानामुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे सगळ्यांकडून चालकांचं कौतुक करण्यात येतं. मात्र अपघात कधी थांबतील आणि नागरिक सुरक्षित प्रवास कधी करु शकतील , असा प्रश्न अनुत्तरीतच आहे.