Pune Koyta Gang : पुण्यात मागील काही दिवस कोयता गॅंगची (Koyta gang) दहशत पाहायला (Pune crime) मिळाली. त्यानंतर अनेक राजकारण्यांनी कोयता गॅंगवर कारवाई करण्याचे आदेश दिले मात्र आता पोलिसांच्या यादीतूनच कोयता हे नाव गायब झालं आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत कोयता गॅंगची दहशत कमी झाली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


कोयताऐवजी आता एफआयआरमध्ये धारदार शस्त्र असा उल्लेख केला जात आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यांपासून कोयता गॅंगची दहशतीचे प्रकरणं नेमके किती झाले याचा छडा लावता येत नाही. या सगळ्याचा फायदा आरोपींना होणार असल्याचं देखील बोललं जात आहे. आतापर्यंतच्या दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये कोणत्या हत्याराचा वापर केला याचा उल्लेख केला जात होता. मात्र मागील काही दिवसांपासून कोयत्याचा उल्लेख धारदार शस्त्र किंवा हत्यार असा उल्लेख केला जात आहे.


सहा महिन्यांपासून पुण्यात गँगची दहशत


मागील सहा महिन्यांपासून पुण्यात गॅंग धुमाकूळ घालत आहे. कोयता गॅंग आणि चुहा गॅंगच्या अनेक आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं आहे. मात्र या गॅंग अजूनही दहशत माजवत आहेत. त्यामुळे पुणे पोलीस चांगलेच अॅक्शन मोडवर आले आहेत. कोयता विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. त्यासोबतच अनेक कोयतेदेखील जप्त केले आहेत. पुणे शहरामध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात गर्दीची अनेक ठिकाणं आहेत. या सर्व ठिकाणी गाडी घेऊन पेट्रोलिंग करणं शक्य होत नाही. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी पायी पेट्रोलिंग पोलिसांकडून सुरु करण्यात आलं आहे. पायी पेट्रोलिंगमुळे जनतेशी संवादही साधता येतो आणि गुन्हेगारीलाही आळा बसतोय, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 


मोक्का लावा, कठोर कारवाई करा...


पुण्यातील कोयता गॅंगचं प्रकरण मागील अधिवेशनातही चांगलंच चर्चेला आलं होतं. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी कोयता गॅंगच्या गुन्हेगारांवर आरोपीवर मोक्का लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर अनेक नेत्यांनी पुण्यातील कोयता गँगवर कारवाई करण्याची मागणी केली. पुणे पोलिसांनी त्यानंतर काही आरोपींना अटक केली. मात्र कोयता गॅंगचे आरोपी अजूनही दहशत निर्माण करताना बघायला मिळत आहे. कारवाई करुनही कोयता गॅंगची दहशत शहरात कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक पुणेकर धास्तावले आहेत. मात्र आता पोलिसांच्याच गुन्ह्यांच्या यादीतून कोयता हे नाव वगळल्याने याचा आरोपीला फायदा होऊ शकतो, अशा चर्चा रंगत आहे.